महाराष्ट्र

शहीद जवान यश देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्य शासनाच्या वतीने कुटुंबियांना एक कोटी रूपयांची मदत जाहीर

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 28 –  ‘शहीद यश देशमुख अमर रहे’ च्या जयघोषात इन्फन्ट्री बटालियन 101 मध्ये कार्यरत असलेले शहीद जवान यश दिंगबर देशमुख यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता त्यांच्या मूळगावी पिंपळगाव,  ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुरुवार 26 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात यश देशमुख यांना वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे कृषी व सैनिक  कल्याणमंत्री दादाजी भुसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत,  अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर आदींसह अधिकारी, देशमुख कुटुंबियांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

शहीद यश देशमुख यांच्या पार्थिवास सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्य शासनाच्या वतीने सैनिक कल्याणमंत्री श्री. भुसे, पालकमंत्री श्री. पाटील यांच्यासह खासदार श्री. पाटील, आमदार श्री. चव्हाण यांनी, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. राऊत, पोलीस दलाच्या वतीने श्री. गोरे, सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने श्री. पाटील, उपविभागीय अधिकारी श्री. साताळकर यांनी व लष्कराच्या वतीनेही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

सैनिक कल्याण मंत्री श्री. भुसे म्हणाले, दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात यश देशमुख शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांप्रति राज्य शासनाच्या सहवेदना असून यश यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने एक कोटी रुपयांची मदत करण्यात येईल. पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शहीद यश देशमुख यांच्या कार्याची दखल घेण्यात येईल. शहीद देशमुख यांच्या गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले. खासदार श्री. पाटील म्हणाले, की जवान यश देशमुख यांनी देशाच्या संरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची नोंद इतिहासात होईल. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही तसेच त्यांचे यशोथित स्मारक उभारण्यात येईल, असे आमदार श्री. चव्हाण यांनी श्रध्दांजली वाहताना सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संतोष देशमुख यांनी श्रध्दांजली वाहिली.

तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता यश यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. कुटुंबीय व नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर  फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांना पोलिस दल, सैन्य दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर यश देशमुख यांच्या पार्थिवास त्यांचे लहान बंधू पंकज यांनी अग्नी दिला. शहीद यश यांच्यामागे आई- वडील दिगंबर देशमुख, सुरेखाबाई देशमुख, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!