आनंदवन : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषप्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल आमटे यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
दरम्यान, डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्यही होत्या. यासह शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या. स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
आमटे कुटुंबीय आणि महारोगी सेवा समितीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे वृत्त आले होते. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होतं. त्यामध्ये त्यांनी आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. नंतर हा व्हिडिओ त्यांनी काढून टाकला होता.
त्यानंतर डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून शीतल आमटे यांच्या आरोपांशी सहमत नसल्याचे सांगितले होते. आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले होते. या पत्रकात डॉ. शीतल आमटे या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या व्हीडीओमध्ये सुधा अशी कबुली दिल्याचे या पत्रकात म्हंटले होते.
शीतल आमटे यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे पत्रक देण्यात येत असल्याचे आमटे कुटुंबीयांनी म्हंटले होते.