ठाणे दि. २ : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजनेच्या आमचा गाव आमचा विकास उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण विस्तार अधिकारी आणि पर्यवेक्षकांना देण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने आयोजित केलेले हे प्रशिक्षण शिबीर नुकतेच शहापूरच्या वनविभाग येथे संपन्न झाले.
१५ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार आमचा गाव, आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी विविध स्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. आजची कार्यशाळा ही जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असणाऱ्या विस्तार अधिकारी आणि पर्यवेक्षकांनासाठी आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेत यशदा येथे प्रशिक्षण घेतलेले तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी आमचा गाव आमचा विकास उपक्रमाची ओळख व उद्देश याची माहिती सांगितली. गावाचा विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत अधिकऱ्यांची भूमिका व जबाबदाऱ्या काय आहेत याची माहिती सांगितली. त्याचबरोबर योजनांचे अभिसरण, मूल्यमापन व ध्ययेनिश्चिती कशी असावी याबाबत सखोल मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले.
प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी गाव आराखडा तयार करणे गरजेचे असते. त्याअनुषंगाने गाव विकास प्रक्रियेत सहभागी असणार्या प्रत्येक घटकाला प्रशिक्षण देऊन गाव विकास आराखडा कसा तयार करावा याची माहिती दिली जात आहे. यासाठीच गाव पातळी पासून जिल्हा स्तरावर विविध घटकांच्या कार्यशाळा ग्रामपंचायत विभाग वेळोवेळी घेणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार यांनी सांगितले. या कार्यशाळेत जिल्हा पेसा समन्वयक मीनल बाणे आणि यशदा तज्ञ मंडळीनी मार्गदर्शन केले. कोविड १९ संदर्भात शासनाने निर्गमित केलेले सर्व नियम पाळून कार्यशाळा घेण्यात आली.