डोंबिवली ( शंकर जाधव ) : बनावट बायो डिझल तयार करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छडा लावला असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून यातील मुख्य आरोपी फरार त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी छापा मारलेल्या ठिकाणाहून सुमारे ११ हजार लिटर बनावट बायो डिझेल व इत्यादी सामुग्री असा एकूण ३० लाख २१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पवन श्रीराजनप्रसाद यादव (२६), कृश्णा सुरेष शुक्ला (२६), रोहन शेलार (३४) पंकज रामकुमार सिंग (२७) विपुल रविंद्र वाघमारे, (२८) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नाव असून मुख्य आरोपी संदेश राणे हा फरार आहे. डोम्बिवली पूर्वेतील मानपाडा येथील आडवली गाव या ठिकाणी बेकायदेशीररीत्या बनावट बायो डिझेल तयार करून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीची शहनिशा करून सहाय्यक पोलीस आयुक्त किशन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि संजू जॉन सपोनि. भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुद्गुण,शरद पंजे, अजित राजपूत . दिघे, पोलीस अंमलदार भोसले, चव्हाण ,पवार आदी पथकाने बुधवारी सादर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे एका गाळयामध्ये मिनिरल टरपेंट ,ऑइल व बेस ऑइल यांचे मिश्रण करुन त्यामध्ये रासायनिक रंग मिसळुन भेसळयुक्त बायो डिझेल तयार करण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी सादर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेले भेसळयुक्त बायो डिझल आणि इतर रसायन आणि साहित्य जप्त करून पाच जणांना अटक केली आहे. या टोळीचा सूत्रधार संदेश राणे मात्र पळून गेला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती संजू जॉन यांनी दिली.
दरम्यान पोलिसांनी छापा मारलेल्या ठिकाणाहून सुमारे ११ हजार लिटर बनावट बायो डिझेल व इत्यादी सामुग्री असा एकूण ३० लाख २१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भेसळयुक्त बायो डिझल तयार करून बाजारात त्याची डिझलच्यया भावाने विक्री केली जात असून हे बायो डिझल जहाज, मासेमारी नौका यांच्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.