डोंबिवली ( शंकर जाधव ) : देशाचे भविष्य उज्जल होण्यासाठी प्रत्येकाने शिकून आपल्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे. जगात मनुष्यच असा प्राणी आहे त्याने शिकून जगाची प्रगती केली.नेमकी हीच माहिती देणारे शिल्प डोंबिवलीतील आकर्षण ठरले आहे. पृथ्वीच्या गोलाकार प्रतिमेवर पुस्तक वाचत असलेला मुलगा आणि लॅपटॉपवर काम करणारी मुलगी अशा शैक्षणिक विषयावर लक्ष केंद्रित करणारे शिल्प पाहण्यासाठी डोंबिवलीकर गर्दी करत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका विभागातील गणेश मंदिर एलोरा सोसायटी प्रभाग क्रमाक ६० येथील नगरसेविका मनीषा धात्रक यांनी प्रभागात नामनिर्देशित फलाकांसह सौंदर्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान निगडीत अशी शिल्पे उभारली आहेत. प्रभागातील नागरी समस्या आणि मुलभूत गरजा लक्षपूर्वक सोडविण्यावर भर देऊन प्रभागाची एक वेगळी ओळख आहे.
या नामनिर्देशीत फलकांच्या शुभारंभप्रसंगी नगरसेवक शैलेश धात्रक, चित्रकार सुधाकर नाईक, राजूसिंग, किशोर पाटील, केतन संघांनी, सचिन सावंत, सुरज गुप्ता, गजेंद्र धात्रक, सुचिता धात्रक, नमिता कीर, प्राची शेलेकर, दिव्या परब, मनाली कदम यांच्यासह प्रभागातील नागरीका उपस्थित होते. नगरसेविका मनीषा धात्रक यांनी नुकतेच पं.दीनदयाळ मार्गावरील जुने पोष्टकार्यालय शेजारी असणाऱ्या गल्लीच्या नामनिर्देशित फलकाचे उद्घाटन केले.सदर गल्लीला स्व.सौ.चित्रा सुधाकर नाईक पदपथ असे नाव देण्यात आले असून या ठिकाणी देखण्या लाफिंगबुद्धाचे शिल्प बसविण्यात आले आहे. डोंबिवलीकर प्रसिद्ध चित्रकार सुधाकर नाईक याच प्रभागात राहत असून यांच्या स्वर्गीय पत्नीचे नांव पदपथास दिल्यामुळे प्रभागातील नागरिकांची ही मागणी पूर्ण झाली आहे. चित्रकार अतुक व अंजू नाईक यांच्या हस्ते नामकरण सोहळा संपन्न झाला.
तसेच देवी चौक क्रॉस रोड येथील पदपथाचे नामकरण करण्यात आले.रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या या प्रभागात फेरीवालामुक्त प्रभाग म्हणूनही गणना प्रभागाची होत असून आता प्रभागातील आकर्षित शिल्पांसह नामनिर्देशित फलक डोंबिवलीकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.