डोंबिवली ( शंकर जाधव ) : लॉकडाऊन मध्ये नागरिकाची आर्थिक विवंचना झाल्याने घर चालवेनमुश्कील झाले असताना शाळेची फी कशी भरणार असा प्रश्न पालकवर्गाना पडला आहे. शाळेची फी भराच असा तकादा शाळेने लावला असल्याने पालकवर्गांनी मनसेकडे धाव घेतली.महाराष्ट्र नवनिर्माण महपालिका कामगार कर्मचारी सेना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अध्यक्ष मनोज घरत यांची दोनशे पालकांनी भेट घेतली. घरत यांनी पालकवर्गांचे म्हणणे एकून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
कोरोना संकटामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील संपूर्ण शाळा ,कॉलेज बंद असल्याने शाळा प्रशासनाने फी संदर्भात विद्यार्थ्यांवर वा त्यांच्या पालकांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये व फी मध्ये सवलत देण्यात यावी असे असतानाही डोंबिवली मधील हॉली एंजल्स शाळेने मात्र पालकांना संपूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. वैतागलेल्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण महपालिका कामगार कर्मचारी सेना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अध्यक्ष मनोज घरत यांची भेट घेतली. यावर तोडगा काढण्याची विनंती केली. घरत यांनी शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्यावी अशी विनंती करून सुद्धा शाळेने मान्य न केल्याने पालकवर्गात अधिक संताप पसरला आहे. शाळा प्रशासनाने महिना अखेर फी सवलतीत ठोस निर्णय न घेतल्यास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मनसे स्टाईलने हिसका दाखवला जाईल असा इशारा घरत यांनी दिला आहे.
या शाळेत सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून सध्या स्थितीत शाळा शिक्षकांना देखील कमी पगार देत आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु आहे. ऑन लाईन प्रक्रियेत शाळेला खर्च कमी येत असून शाळेची मनमानी सुरु आहे.आम्ही ही मनमानी खपवून घेणार नाही. पालकांना न्याय मिळेपर्यंत मनसे पालकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याचे घरत यांनी उपस्थित पालकांना सांगितले.यासंदर्भात मुख्याध्यापक उमेन डेविड यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.