डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनाचे संकट दूर झाले नसून त्यापासून वाचण्यासाठी सरकारने काही नियम पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र काही नागरीक या नियमाचे पालन करत नसते. विशेष म्हणजे सरकारी कार्यालयातही याचे पालन होत नाही. कल्याण डोंबिवली महानगर पालिका माध्यमातून मालमत्ता कर बिल भरण्यासाठी ७५ टक्के भरघोस सूट देण्यात आली असुन त्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. या सुविधेचा फायदा डोंबिवलीकर घेत आहेत. परंतु मालमत्ता कर भरण्यासाठी करदात्यांनी विभागीय कार्यालयात गर्दी केली असल्याने पालिकेच्या कार्यालयातच सोशल डीस्टसिंग नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसते.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका डोंबिवली विभागीय कार्यालयात नेहमी उद्घोषणेद्वारे सतत कोविड-१९ बाबत जनजागृती केली जाते. चेहऱ्यावर मास्क लावा, सतत हात स्वच्छ करा, एकमेकांपासून अंतर ठेवा असे या उद्घोषणेद्वारे मिनिटा-मिनिटाला सांगितले जाते. परंतु याकडे विभागीय कार्यालयात मालमत्ता बिल भरण्यासाठी आलेले ग्राहक दुर्लक्ष करीत आहेत. महापलिका अधिकाऱ्यांनाही नियमांच्या उद्घोषणांचे शब्द कानावर पडत असूनही ते फक्त पालिकेची तिजोरी भरण्याकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. बिल भरणा करण्यासाठी आलेल्या ग्राहकासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था करण्यात आली नाही. मात्र इतर उद्योजकांनी कोरोना बचावासाठी नियमांचे पालन करावे असा आग्रह पालिकेचा असतो.
पालिकेचे सुरक्षा रक्षक जरी जागता पहारा ठेवीत असले तरी ते ही ‘सोशल डीस्टसिंग’ बाबत जागरूक नाहीत. कोरोनाच्या नव्या साखळीमुळे सगळीकडे घबराट पसरली असली तरी मात्र कर व इतर देयक भरणा करण्यासाठी येणारे नागरिक काळजी घेत नसल्याचे यावरून दिसते.