डोंबिवली ( शंकर जाधव ) : जिल्ह्यातील उंचीच्या बाबतीत दुसरे स्थान पटकावणारा सतत डौलाने फडकत राहणारा डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर चौकातील संकल्पतीर्थ परिसरात १५० फुट उंचीच्या तिरंगा ध्वजाच्या कामाचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महिला पदाधिकारी कविता गावंड, मंगला सुळे,माजी नगरसेवक रवी म्हात्रे, पंढरीनाथ पाटील. तात्या माने, अभिजीत थरवळ, विवेक खामकर, संतोष चव्हाण,किशोर मानकामे,माजी नगरसेविका सारिका चव्हाण, अदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देशासाठी भारत मातेच्या रक्षणासाठी स्वताच्या प्रणाची आहुती देणाऱ्या थोर हुतात्म्याच्या स्मरणाने पावन झालेल्या डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर चौकातील संकल्पतीर्थ परिसरात हा झेंडा उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे.हा झेंडा उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या रीतसर परवानग्या घेण्यात आल्या असून राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. २० फुट खोल पाया खनत राष्ट्रध्वजाच्या उभारणीचे काम सुरु झाले आहे. डोंबिवलीतील दत्तनगर चौकात २००७ साली असलेले डम्पिंग ग्राउंड हटविण्यासाठी याठिकाणी तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून संकल्पतीर्थ उभारण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीराचे स्मरण प्रत्येकाला व्हावे यासाठी या भिंतीवर म्युरल आर्ट मध्ये शिवाजी महाराज,सावरकर,डॉ. हेडगेवार यासह अनेक हुताम्याच्या प्रतिमा साकारण्यात आल्या असून शत्रूवर आक्रमण करण्याच्या जोशात असलेली भारतमाता या संकल्प तीर्थाच्या मध्यभागी मागील १४ वर्षे दिमाखात उभी आहे. या चौकात संकल्पतीर्थाला नवी झळाळी दिली जाणार असून याच संकल्पतीर्थासमोरील जागा राष्ट्रध्वज उभारणीसाठी निवडण्यात आली आहे.१५० फुट उंच राष्ट्रध्वजाचा खांब उभारून यावर ३० फुट बाय २० फुट आकाराचा कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे.
हे ध्वजारोहण प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्र्याच्या हस्ते केले जाणार असल्याने यंदाचा प्रजासत्ताक दिन डोंबिवली शहरासाठी खास ठरणार आहे. झेंडा ९९ फूट असेल तर संध्याकाळी त्याला खाली उतरवावे लागते. पण शंभर फूटापेक्षा जास्त उंचीचा ध्वज कायम स्वरूपी फडकत ठेवता येतो. जर तो फाटला अथवा खराब झाला तर उतरवून दुसरा लावणे किंवा तो स्वच्छ करून लावता येतो. शिवाय झेंडा कायम प्रकाशझोतात ठेवावा लागतो. त्यासाठी समोरच फोकसची व्यवस्था केली जाणार असून झेंड्याचे पावित्र्य राखण्यासाठी कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले,हा झेंडा उभा राहिला पाहिजे यासाठी राजेश मोरे यांनी गेले पाच सहा महिने सातत्याने पाठपुरावा केला आहे.राष्ट्रध्वज उभा करण्यासाठी परवानगी दिल्ली हून मिळते. ती सहज मिळत नाही. यासाठी मोरे यांनी अथक प्रयत्न केले आहेत.काही लोक वर्षानुवर्षे गटार पायवाटा यांची कामे करतात. राजेश मोरे यांनी उभे केलेले राष्ट्र ध्वजाचे काम महत्त्वाचे आहे.त्याची देखभाल, निगा राखली गेली पाहिजे. पालिकेच्या अधिका-यांनी देखभालीसाठी लक्ष द्यावे. एखाद्या प्रभागाचा विकास व्हायचा असेल तर त्याचा कायापालट झाला पाहिजे.राजेश मोरे यांनी प्रभागात भरपूर कामे केली आहेत.