मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील घरकुलांची पाहणी
ठाणे दि. १४ : ग्रामीण भागांतील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात ‘महा आवास अभियान ग्रामीण’ राबविले जात आहे. ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात देखील या अभियानाची यशस्वी अंमलबजवणी होत आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सयुक्तिक दौरा करून मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील घरकुलांची पाहणी केली. यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.
या अभियान काळात १५८७ घरकुल बांधण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर या पाचही तालुक्यात विविध ठिकाणी ही घरकुल उभी राहत आहेत. डॉ. सातपुते आणि श्री. पवार यांनी दौरा करून प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला. तसेच ज्या घरांची बांधकामे सुरु आहेत ती विहित वेळेत करण्याच्या ग्रामीण विकास यंत्रणां विभागाला सूचना केल्या. आणि महा आवास अभियाना अंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून महिला बचत गटांच्या महासंघामार्फत घरकुल मार्ट उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.
ग्रामीण विकास यंत्रणां विभागाला सूचना केल्या. तसेच या दरम्यान त्यांनी घरकुल योजनेच्या पाहणीसह वनराई बंधारे ,बचतगटातील महिला सदस्यांनी तयार केलेली पोषण परसबाग (Nutrigarden), जि.प. सेस फंडातून कृषि विभाग राबवत असलेली औजारे बँक योजना, आदि योजनांची पाहणी केली. या वेळी मुरबाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश अवचार , ग्रामपंचायत कोरावळेचे सरपंच ,ग्रामसेवक, ग्रामस्थ, तसेच जि.ग्रा.वि.यंत्रणा ठाणे, ग्रामीण जीवन उन्नती अभियान, कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.