वंचित बहुजन आघाडीची महावितरणकडे मागणी
येत्या पंधरा दिवसात मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू – समन्वयक हरीश गुप्ता
अंबरनाथ दि. १५ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : कोरोना काळात सरकारने मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे गोरगरिबांचा काम धंदा व उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झालेला आहे. अशावेळी शासनाची जबाबदारी जग जाहीर झालीच आहे. शासनातील अनेक मंत्र्यांनी बिलांसंदर्भात उलटसुलट उत्तरे देऊन महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचा एक प्रकारे अवमान केला आहे
. किमान शासनाने या काळातील बिजबिलात सवलत देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती, परंतु, अद्यापि ठोस भूमिका सरकार घेत नसल्यामुळे नागरिकांमध्ये एकप्रकारे शासनाविरोधात चीड निर्माण झाली आहे आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ तर्फे “वीजबिलावरील किमान पन्नास टक्के सूट व त्यावरील व्याज रद्द करण्यात यावे” अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराचे समन्वयक हरीश हिरालाल गुप्ता यांनी लेखी निवेदनाद्वारे महावितरणच्या संबधित अधिकाऱ्यांकडे केली आहे, गुप्ता म्हणाले कि, वीजबिलावरील किमान पन्नास टक्के सूट व त्यावरील व्याज रद्द करण्यात न आल्यास येत्या पंधरा दिवसात पक्षातर्फे अंबरनाथ शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराहि हरीश गुप्ता यांनी दिला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अविनाश गाडे, दिलीप सोनकांबळे, अण्णा साळवे, धनंजय लभाणे, बी.पी. सरदार, मनोज खोब्रागडे, राजाराम भोईर, श्रीनिवास डिकोंडा यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.