कोरोना काळातही उत्पन्न वाढीला चालना देणारा सन 2021-22 चा 2755.32 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केला स्थायी समितीस सादर
ठाणे (ता 5, संतोष पडवळ ): कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, भांडवली खर्चात स्वीकरलेल्या दायित्वातील कामे पूर्ण करण्यावर भर देणारा, वास्तववादी अर्थसंकल्प तसेच कोरोना काळातही उत्पन्न वाढीसाठी साहाय्यभूत ठरणार ठाणे महानगरपालिकेचा सन 2020- 2021 चा सुधारित 2807.03 कोटी रूपयांचा तर सन 2021-2022 सालचा 2755.32 कोटी रूपयांचा मुळ अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना सादर केला.
महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांचा पहिलाच अर्थसंकल्प असून कोरोनाच्या सावटाखालील या अर्थसंकल्पांमध्ये कोणतेही करवाढ, दरवाढ न सुचविता वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्यावर भर देण्यात आला आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाचा जागतिक महामारीमुळे सर्वत्र संसर्ग टाळण्यासाठी व त्यावरील उपाय योजनेचा भाग म्हणून देशपातळीवर लॉकडाऊन लागू करावा लागला. त्याचा परिणाम सर्व उदयोगधंदे, व्यवसाय व रोजगारावर झाल्यामुळे महापालिकेसही अपेक्षित असलेले कर, दर व शुल्कापोटी महसुल प्राप्त झाला नाही. परिणामी महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली. कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत वैदयकीय सेवा व सुविधांसाठी मोठया प्रमाणावर निधी खर्च करावा लागल्याने विकासकामावर कमी निधी खर्च केला असला तरी देखील अत्यावश्यक विकास कामासाठी महापालिकेने निधी खर्च केला आहे. सन 2020-21 चे सुधारित अंदाजपत्रक रु. 2807.03 कोटी मंजूर करण्यात आले होते. कोरोना व त्याच्या नियंत्रणासाठी केलेल्या लॉकडॉऊनमुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठया प्रमाणात घट झाल्याने मूळ अंदाजपत्रक रु. 2755.32 लक्षचे तयार करण्यात आले आहे.
सन 2021-22 या आर्थिक वर्षात भांडवली खर्चासाठी एकूण रु. 935 कोटी 37 लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने सुरु असलेल्या कामांसाठी तरतुदी प्रस्तावित आहेत. यामध्ये पाणी पुरवठा विभागाच्या भांडवली कामांसाठी रु.114 कोटी 29 लक्ष तरतूद करण्यात आली आहे . मलनि:सारण विभागासाठी रु. 72 कोटी 50 लक्ष तरतूद करण्यात आली असून प्रकल्पांतर्गत भुयारी गटार योजना व अमृत योजनेसाठी रु. 50 कोटी 69 लक्षची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.या अर्थसंकल्पामध्ये पूल प्रकल्पांसाठी एकूण रु.48 कोटी 17 लक्ष तरतूद प्रस्तावित आहे तर रस्ते विकसनासाठी विविध लेखाशीर्षांतर्गत रु. 240 कोटी 25 लक्ष तरतूद प्रस्तावित आहे. रस्त्यावरील दिवाबत्तीसाठी रु. 36 कोटी 33 लक्ष तरतूद भांडवली कामांसाठी सन 2020-21 मध्ये प्रस्तावित आहे. आरोग्य यंत्रणेसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व इतर रुग्णालयांमधील उपकरणे व इतर कामांसाठी रु. 27 कोटी 10 लक्ष तरतूद करण्यात आली आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी रु.29 कोटी 20 लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. सन 2021-22 च्या अर्थसंकल्पातील विविध लेखाशीर्षांतर्गत करण्यात आलेल्या तरतुदीनुसार ध्येये साध्य करण्याचा प्रयत्न आहे.
अशा प्रकारे रु. 35 लक्ष अखेरच्या शिल्लकेसह रु. 1819 कोटी 61 लक्ष महसुली व रु. 935 कोटी 37 लक्ष भांडवली खर्च असे एकूण रु.2755 कोटी 32 लक्ष रकमेचे खर्चाचे अंदाजपत्र स्थायी समितीस सादर करण्यात आले आहे.
सन 2020-21 मध्ये महसुली खर्चासाठी रु.1931 कोटी 49 लक्ष खर्चाचे अंदाज प्रस्तावित होते. सुधारित अंदाजपत्रकात रु. 182 कोटी 38 लक्ष खर्चात कपात करुन ते रु.1749 कोटी 11 लक्ष करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन वेळीच केलेल्या उपाय योजनांवर आतापर्यंत प्रत्यक्ष खर्च रु. 81 कोटी 15 लक्ष झाला आहे. कोरोना नियंत्रणासाठी वेळीच निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे इतर खर्चावर नियंत्रण आणले आहे. भांडवली खर्चासाठी रु.2154 कोटी 02 लक्ष तरतूद प्रस्तावित होती त्यात जवळपास 49 % कपात करुन ती रु. 1057 कोटी 36 लक्ष करण्यात आली आहे.
सन 2021-22 मध्ये खर्चासाठी तरतुदी प्रस्तावित करतांना उत्पन्नातील अपेक्षित घट विचारात घेऊन जवळपास सर्वच खर्चात कपात करण्यात आली असून कोणतेही नवीन प्रकल्प न घेता, हाती घेतलेल्या कामांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला आहे.
सन 2021-22 मध्ये महसुली खर्चासाठी रु. 1819 कोटी 61 लक्ष तरतूद करण्यात आली असून भांडवली खर्चासाठी रु.935 कोटी 37 लक्ष तरतूद प्रस्तावित आहे.
महसुली खर्चामध्ये वेतन व भत्त्यावरील तरतूद रु.902 कोटी 66 लक्ष तरतूद प्रस्तावित असून यामध्ये 7 व्या वेतन आयोगापोटी रु.75 कोटी तरतुदीचा समावेश आहे. तसेच महसुली खर्चामध्ये आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन व शिक्षण विभागासाठी पुरेशा तरतुदी प्रस्तावित आहे. परिवहन सेवेसाठी महसुली व भांडवली मिळून रु. 122 कोटी 50 लक्ष तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत :
मालमत्ता कर : मालमत्ता कर व फी पासून सन 2020-21 मध्ये रु. 773 कोटी 26 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु डिसेंबर 2020 पर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न पहाता मालमत्ता करापासून उत्पन्न रु.609 कोटी 54 लक्ष सुधारित करण्यात येत आहे. सन 2021-22 मध्ये मालमत्ता कर व फीसह रु. 693 कोटी 24 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित केले आहे.
विकास व तत्सम शुल्क : सन 2020-21 मध्ये शहर विकास विभागाकडून विकास व तत्सम शुल्कापोटी रु.984 कोटी उत्पन्न अपेक्षित केले होते. लॉकडाऊनचा फटका हा सर्वात जास्त रिअल इस्टेट क्षेत्राला बसला आहे. स्वगावी गेलेले मजूर, लोकांच्या उत्पन्नात आलेली घट याचा मोठा परिणाम या क्षेत्रावर झाल्यामुळे पर्यायाने महापालिकेच्या उत्पन्नात भरुन न येणारी तूट आली आहे. यामुळेच शहर विकास विभागाकडील उत्पन्न रु.984 कोटी वरुन रु.260 कोटी सुधारित करण्यात आले आहे. शहर विकास विभागास या मंदीचा फटका पुढील वर्षी सुद्धा बसण्याची शक्यता असल्याने सन 2021- 22 मध्ये रु.342 कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे.
स्थानिक संस्था कर : स्थानिक संस्था कर विभागाकडे वस्तू व सेवाकर अनुदानापोटी रु.840 कोटी , मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान रु.220 कोटी, स्थानिक संस्था कर व जकातीची मागील वसुली रु.46 कोटी असे एकूण रु.1106 कोटी अपेक्षित केले होते. शासनाकडून वस्तू व सेवाकर अनुदानाची रक्कम नियमितपणे प्राप्त होत आहे. परंतु मुद्रांक शुल्क अधिभारापोटी मिळणारे अनुदान माहे ऑक्टोबर 2019 पासून प्राप्त झालेले नाही. मार्च 2021 पर्यंत रु. 150 कोटी अपेक्षित केले आहे. स्थानिक संस्था कराच्या मागील थकबाकीचे ॲसेसमेंट सुरु आहे. परंतु अपेक्षित केलेले रु.40 कोटी प्राप्त होणे अशक्य आहे. यामुळेच या सर्व बाबींचा विचार करुन एकूण रु. 1000 कोटी 1 लक्ष उत्पन्न सुधारित केले असून सन 2021-22 साठी रु. 1152 कोटी 70 लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.
पाणी पुरवठा आकार : पाणी पुरवठा आकारासाठी सन 2020-21 मध्ये रु. 225 कोटी उत्पन्न अपेक्षित होते. यामध्ये मिटरद्वारे व ठोक दराने पाणी पुरवठयाच्या दरात वाढ सुचविण्यात आली होती. सदरची वाढ नामंजूर झाल्याने पाणी पुरवठा आकारापोटी रु.160 कोटी उत्पन्न सुधारित अंदाजपत्रकात अपेक्षित केले असून सन 2021-22 मध्ये रु.200 कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे.
अग्निशमन दल : अग्निशमन विभागात देखील शहर विकास विभागाप्रमाणे उत्पन्नात मोठी तूट असून मूळ अंदाज रु.100 कोटी वरुन रु. 48 कोटी 37 लक्ष सुधारित अंदाज प्रस्तावित केले असून सन 2021-22 मध्ये रु.98 कोटी 26 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे.
स्थावर मालमत्ता विभाग : सन 2020-21 या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता विभागाकडून रु.50 कोटी वरुन रु.14कोटी88 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे. सन 2021-22 मध्ये स्थावर मालमत्ता विभागाकडून रु. 21 कोटी 05 लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.
जाहिरात फी : जाहिरात फी पोटी सन 2020-21 मध्ये रु.40 कोटी 37 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे ते रु. 10 कोटी 84 लक्ष सुधारित करण्यात आले असून सन 2021-22 मध्ये रु.22 कोटी 37 लक्ष अंदाजित केले आहे.
क्रीडाप्रेक्षागृह, नाटयगृह, तरणतलाव इ. विभाग लॉकडाऊन मुळे बंद असल्याने अल्पसे उत्पन्न प्राप्त होणार असल्याने सुधारित अंदाजपत्रकात उत्पन्नाचे उद्दिष्ट कमी करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये कोव्हीड च्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आल्यामुळे रुग्ण फी कमी प्रमाणात जमा झाली आहे.
अनुदाने : सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी रु. 156 कोटी 98 लक्ष अनुदान अपेक्षित होते. आतापर्यंत रु.125 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये कोरोनासाठी शासनाकडून रु. 5.97 कोटी, एमएमआरडीए कडून रु. 25 कोटी व वित्त आयोगाकडून रु. 23.25 कोटी अतिरिक्त अनुदान प्राप्त झाले असल्याने अनुदानापोटी सुधारित अंदाज रु. 212 कोटी 16 लक्ष अपेक्षित केले असून पुढील वर्षासाठी रु.107कोटी 67 लक्ष अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे.
कर्जे : सन 2020-21 मध्ये विकास कामांसाठी रु. 500 कोटी कर्ज अंदाजपत्रकात अपेक्षित होते. सन 2020-21 मध्ये महापालिका उत्पन्नात जरी तूट असली तरी, उत्पन्नाच्या प्रमाणात खर्चावर नियंत्रण ठेवल्यामुळे कर्ज उभारण्याची आवश्यकता भासली नसल्याने सन 2020- 21 व सन 2021-22 मध्ये देखील कर्ज अपेक्षित केले नाही. आजमितीस महापालिकेवर रु. 164 कोटी 49 लक्ष कर्ज शिल्लक आहे.
अशा प्रकारे सन 2020-21 मध्ये आरंभिची शिल्लक रु.392 कोटी 78 लक्ष सह एकूण अंदाजपत्रक रु. 2807 कोटी 03 लक्ष व सन 2021-22 मध्ये आरंभिची शिल्लक रु. 56 लक्ष सह रु. 2755 कोटी 32 लक्ष जमेचे अंदाज प्रस्तावित करण्यात आले आहेत.