मुरबाड तालुक्यातील विविध कामांची केली पाहणी.
ठाणे दि.१८: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे हे विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्येक तालुका निहाय सखोल आढावा घेत आहेत. आज त्यांनी मुरबाड तालुक्याचा आढावा घेतानाच रखडलेल्या योजना मार्च अखेर मार्गी न लागल्यास संबधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत बैठकीत दिले.
महा आवास अभियान काळात पूर्ण करत असलेली घरकुल कामं, जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीच्या कामांचा ग्रामपंचायत निहाय आढावा घेतला. ही दोन्ही कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले. त्याच बरोबर ग्रामपंचायत, आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा, पाणी पुरवठा यांत्रिकी, महिला व बाल कल्याण , शिक्षण विभाग, आदी विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तरपणे आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा) एच.एल. भस्मे, कार्यकारी अभियंता ( बांधकाम) नितीन पालवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले, मुरबाड गट विकास अधिकारी रमेश अवचार आदी अधिकारी तसेच ग्रामसेवक, जिल्हा आणि तालुका स्तरावरील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकी नंतर तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी देण्यात आल्या.यामध्ये शिवळे, मोहोप ग्रामपंचायतीची पाहणी केली. महा आवास अभियान अंतर्गत ग्राम पंचायत नांदगाव येथील प्रधानमंत्री आवस योजनातून बांधलेल्या घराची पाहणी केली. लाभार्थी यांनी गृहप्रवेश करताना श्री.दांगडे यांनी घराची चावी देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच घरकुल लाभार्थी जनार्दन गणू आलम यांनी तयार केलीली उत्कृष्ट परसबागेची पाहणी केली. त्याचबरोबर अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी, शाळा, आणि बांधकाम विभागाच्या कामांची पाहणी केली.