समाजसेवक विश्वजीत करंजुले पाटील यांच्या उपोषणाला यश
अंबरनाथ मोरीवली पाडा परिसरात रस्त्यांचे डांबरीकरण
अंबरनाथ दि. १८ (नवाज अब्दुलसत्तार वणू) :अंबरनाथ पूर्व भागातील चिखलोली प्रभाग क्रमांक ३९ मधील मोरीवली पाडा येथील बेकायदेशीर डम्पिंग हटवा तसेच ग्रीन सिटी चौक ते जेष्ठ नागरिक कट्टा व सदाशिव पुरम ते मोरीवली पाडा रस्ता आदी मागण्यांसाठी गेल्या ५ फेब्रुवारी २०२१ रोजी भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांच्या मोठ्या पाठिंब्याने सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत करंजुले पाटील यांनी केलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले असून पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी आश्वासन पूर्तता करत गुरुवारी येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मोरीवली पाडा येथील बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. विषारी धूर प्रदूषण आणि दुर्गंधीमुळे परिसरातील त्रस्त नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षापासून डम्पिंग हटाव मागणी केली जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीअभावी चिखलोली येथील अधिकृत डम्पिंग ग्राउंड मोकळे ठेवून अनेक वर्षापासून आदिवासी-कातकरी पाडा म्हणून ओळखला जाणार्या मोरीवली पाडा परिसरात बेकायदेशीर कचरा टाकून राजरोसपणे जाळला जात असल्याने या धूर प्रदूषणामुळे अनेक श्वसन रोगाने नागरिक व्याधीग्रस्त होऊ लागले आहेत. वारंवार पाठपुरावा केला जात आहे.अखेर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी डंपिंगबाबत लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार येत्या महिन्याभरात येथील डम्पिंगचा प्रश्न सोडवू असे लेखी आश्वासन देताना येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम गुरुवारी सुरू करून दिलेला शब्द पाळून आश्वासन पूर्ती केल्याचे भाजपा शहराध्यक्ष अभिजीत करंजुले पाटील यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करताना सांगितले. यावेळी भाजपा सरचिटणीस दिलीप कणसे,विश्वास निंबाळकर, अप्पा कुलकर्णी, अशोक गुंजाळ, मीडिया सेलचे संतोष वंदाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चिखलोली प्रभाग क्रमांक ३९ मधील मोरीवली पाडा परिसरातील अनेक ज्वलंत प्रश्न मागील लोकप्रतिनिधी काळात सुटलेले नाहीत येथील लोकांना चालायला धड रस्ते नाहीत. पाणी, ड्रेनेज, गटार, क्रीडांगण, उद्यान अशा अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. लाखो रुपयांचा विविध कर या विस्तारित भागातील मोठ्या गृहसंकुल पार्कमूळे पालिकेला मिळतोय. परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीअभावी विकास वंचित प्रभागातील अनेक ज्वलंत प्रश्नांचा मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. गेल्याच आठवड्यात मी लोकांच्या मोठ्या प्रमाणात पाठिंब्यावर आमरण उपोषण केले होते. अखेर प्रशासनाने उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मोरिवली पाडा परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत करंजुले पाटील यांनी रस्त्यांची पाहणी करताना सांगितले.