ठाणे

सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी म्हणजे निव्वळ फार्स ; पदमुक्त करूनच चौकशी करा – भाजपाची मागणी

ठाणे : स्थावर मालमत्ता अधीक्षक/सहाय्यक आयुक्त श्री. महेश बाबूराव आहेर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणे, पालिका कर्मचाऱ्यांना धमकावणे, अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणे, बोगस लाभार्थी तयार करून सदनिका आणि गाळे देणे, आपली शैक्षणिक माहिती लपवणे व खोटे प्रमाणपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक करणे, आणि चुकीच्या पद्धतीने पदोन्नती मिळवणे असे अनेक आरोप करण्यात आले असून त्या संदर्भात कागदपत्रांसहित लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून श्री. महेश आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयात तेथील कर्मचाऱ्यांना धमकी देत असतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता, विविध प्रसारमाध्यमांनी देखील त्याला प्रसिद्धी दिली होती.

स्थावर मालमत्ता अधीक्षक/सहाय्यक आयुक्त श्री. महेश आहेर यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीनंतर पालिका आयुक्त श्री. विपीन शर्मा यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. वास्तविक इतके गंभीर आरोप झाल्यानंतर व इतक्या तक्रारी आल्यानंतर श्री.महेश आहेर यांना पदमुक्त करूनच या संपूर्ण प्रकरणाची प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे होते, परंतु पालिका आयुक्तांनी तसे न करता चौकशी सुरू केली आहे. महेश आहेर यांना पदमुक्त करून चौकशी केल्यानेच पारदर्शक आणि प्रभावविरहित चौकशी होईल असे भाजपचे म्हणणे आहे.

स्थावर मालमत्ता अधीक्षक/सहाय्यक आयुक्त महेश बाबुराव आहेर यांना पदमुक्त करून पुढील चौकशी करावी व श्री महेश बाबूराव आहेर यांच्या विरोधात आलेल्या सर्व तक्रारी एकत्रित करून सर्व तक्रारदारांना सुनावणीसाठी बोलवावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी दिवा विभागाच्या वतीने आज आयुक्तांकडे करण्यात आली.

स्थावर मालमत्ता अधीक्षक सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या भ्रष्टाचारी व्यवहारांची व त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी याकरिता भाजपच्या वतीने आज पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

स्थावर मालमत्ता अधीक्षक/सहाय्यक आयुक्त श्री महेश बाबूराव आहेर यांची शैक्षणिक अहर्ता नसतानासुद्धा ते पालिकेत उच्च पदावर कार्यरत आहेत. शिवाय त्यांची पदोन्नती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. त्यामुळे त्यांनी पालिकेला सादर केलेल्या कागदपत्रांची चौकशी व्हावी तसेच त्यांनी मुंब्रा, ठाणे येथे बोगस लाभार्थी तयार करून सदनिका आणि ज्ञानाचे वाटप केले आहे आणि ठाणे व मुंब्रा येथे असलेल्या रेंटल हाऊस मध्ये काही सदनिका परस्पर भाड्याने दिल्या आहेत. या सर्व प्रकरणांची सखल चौकशी व्हावी याकरिता भारतीय जनता पार्टी दिवा विभागाने आज पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. शिवाय श्री महेश बाबूराव आहेर यांनी आपल्या मिळकतीची माहिती प्रशासनाला सादर केली नसल्याची दाट शक्यता असल्याने त्यांच्या सर्व मिळकतीची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील भाजपच्या वतीने लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!