आहेर यांना पदमुक्त करुन चौकशी करा भाजपची मागणी
दिवा ( बातमीदार) : ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा वादग्रस्त व्हिडिओ काही दिवसांपूर्वी भाजपकडून व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओ पाठोपाठ अजून एक धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘दम लागतो, इथे सर्वांची मी खाट टाकायला आलो आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य कर्मचाऱ्यासोबत करतानाचा हा व्हिडीओ आहे.
वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे पुन्हा एका नविन व्हिडीओमुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्या पदाची चौकशी करावी अशी मागणी माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली होती. तर त्यांना पदमुक्त करुन त्यांची चौकशी करा अशी मागणी आता दिवा भाजपतर्फे करण्यात आली आहे. ‘अख्खा मुंब्रा माझा आहे, संपूर्ण दिव्यावर झेंडा गाडायचा आहे.
नोकरीमध्ये असलो नसलो तरी काही फरक पडत नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यासमोर केले होते त्याचा व्हिडीओ मागच्या आठवड्यात व्हायरल झाला होता. त्यानंतर आज त्यांचा अजून एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी ‘दम लागतो, इथे सर्वांची मी खाट टाकायला आलो आहे’ असे शब्द वापरीत दिवा प्रभागातील कर्मचाऱ्याला चक्क धमकीच दिली. आता तरी ठाणे महापालिका आयुक्त आणि सत्ताधारी शिवसेना या अधिकाऱ्याला कसा लगाम घालतात हे पहावे लागेल.
आता महेश आहेर, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांचा दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ तून कर्मचाऱ्यावर दमदाटी करत मुजोरी दिसत आहे. या आयुक्तांनी विकासावर लक्ष दिले पाहिजे की दादागिरी ची भाषा केली पाहिजे. भाजपा दिवा शील मंडळाने ठाणे आयुक्तांना तक्रार केल्यानंतर ही हा दुसरा व्हिडिओ समोर येतो. दिव्यावर झेंडा गाडायचा आहे म्हणजे नेमके काय? हा हिटलर आहे का? दिव्यात आजच्या घडीला पाणी, रस्ते, गटार आणि टॅक्स यासाठी यांची नेमणूक केली की हिटलर शाही करायला. या आयुक्ताला निलंबित करून चौकशी करावी ही मागणी ठाणे आयुक्तांना भाजपा दिवा शील मंडळाने केली आहे.
–रोहिदास मुंडे, भाजपा ठाणे शहर कार्यकारणी सदस्य