नवी दिल्ली – अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमधील एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी टि्वट करत माहिती दिली. विशेष म्हणजे, मोदींनी भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन लस टोचून घेतली आहे. यावेळी त्यांच्या गळ्यात घातलेले उपरणं हे आसामी आहे. ते गळ्यात घालून त्यांना अनेकदा पाहण्यात आले आहे. या आसामी उपरण्याला स्थानिक ‘गमुसा’ असं म्हणतात. हे उपरणं देशातील वेगवेगळ्या भागात लोकप्रिय आहे.
पंतप्रधान मोदींना लस टोचवणारी परिचारिका पुदुद्चेरीमधील आहे. त्यांचे नाव पी निवेदा असे आहे. तर दुसरी परिचारिका ही केरळमधील असून त्यांचे नाव रोसम्मा अनिल आहे.
एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरुद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांचे कार्य उल्लेखनीय आहे. लसी घेण्यास पात्र असलेल्या सर्वांना लस घेण्याचे आवाहन करतो. एकत्रितपणे आपण भारत कोरोना मुक्त करूया, असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
देशात कोरोना लसीकरण मोहिमेला 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलीय. परंतु, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते या लसीकरण मोहिमेत का सहभागी झाले नाहीत? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. या निमित्तानं कोरोना लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतल्याने वादावर पडदा पडला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 1 मार्चपासून म्हणजेच सोमावारपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींचं लसीकरण करण्यात येणार आहे. याच टप्प्यात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार ज्यांचं वय 50 वर्षांहून अधिक आहे अशांना कोरोना लस देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना कोरोनाविरोधातील लस विकण्यासाठी 250 रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे कमी किमतीत ही लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनाविरोधातील लस सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत मिळणार आहे. खासगी रुग्णालयात कोरोनाविरोधातील लशीचा एक डोस हा 150 रुपये तर सेवा शुल्क 100 रुपये असा दर केंद्र सरकारने निश्चित केला आहे. हा दर निश्चितीचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य मिशनने घेतला आहे. या निर्णयाची माहिती राज्य व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.
कोरोनाविरोधातील लस घेण्यासाठी नागरिकांना कोव्हिन अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. आरोग्य सेतू अॅप वरुनसुद्धा लसीकरणासाठी नावनोंदणी करता येऊ शकते. 1 मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत 27 कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. हे लसीकरण 10 हजार सरकारी केंद्र तर 20 हजार खासगी लसीकरण केंद्रातून होणार आहे. लसीकरणात कोरोनाविरोधातील लढ्यात आघाडीवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. सीरम इन्टिट्यूचची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन या दोनच लसी भारतात उपलब्ध आहेत. लसीकरणावेळी जी लस उपलब्ध असेल ती लस घ्यावी लागेल.