महाराष्ट्र

कोविडचा समर्थपणे मुकाबला करीत असताना देखील महाराष्ट्रात विकासकामे वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानसभा कामकाज 

मुंबई, दि. 3 : कोरोनाविरुद्धच्या कठीण लढ्याला महाराष्ट्र समर्थपणे सामोरे जात असताना विकास कामांना देखील वेग दिला असून आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेऊन महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेमध्ये उत्तर देताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र सीमाप्रश्न, त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही केंद्र शासनाकडे सर्वांनी एक होत मागणी करण्याचे आवाहनही श्री.ठाकरे यांनी केले.

कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच

कोरोनाची आपत्ती नवी असल्यामुळे आपल्या यंत्रणांना सज्ज करण्याचे मोठे आव्हान होते. रुग्णांच्या प्रमाणात सुरूवातील यंत्रणा कमी होती त्यात वाढ करत गेलो. देशातील पहिले जम्‍बो कोविड रुग्णालय आपण सुरू केले. रुग्ण आल्यानंतर स्वॅब घेतल्यानंतर कोरोना चाचणी येईपर्यंत मृत्यू व्हायचा. परंतू आपण रुग्णसंख्येची वा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही माहिती पारदर्शीपणे दिली. माहिती लपवली नाही त्यामुळे ती संख्या जास्त दिसते आहे. पण त्यामुळे आपल्याला कोरोनाविरुद्धच्या उपाययोजना प्रभावीपणे करता आल्या. कोरोना तपासणीपैकी 80 टक्के चाचण्या आरटीपीसीआर चाचण्या होतात.

कोविडसाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्कफोर्स निर्माण केला. खाजगी रुग्णालयात 80 टक्के खाटा राखीव ठेवल्या; 5 लाख 60 हजार लोकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला.

कोविडचे संकट आले त्यावेळी दोन किंवा तीन चाचणी लॅब होत्या. आज ही संख्या शासकीय आणि खासगी मिळून 500 च्या आसपास आहे. एकट्या मुंबईत 20 ते 25 हजार चाचण्या होत आहेत हे आपले मोठे यश आहे.

मूत्रपिंडाचे विकार असलेल्या रुग्णांसाठी डायलिसीसचे काय करायचे हा मोठा प्रश्न होता. रुग्ण कोविड आहे की नॉनकोविड हे आधी पहायची गरज होती. अशा परिस्थितीत डायलिसीससाठी 150 च्या आसपास सुविधा उपलब्ध करून दिल्या.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत महसूल, आरोग्य विभागाचे कर्मचारी राज्यात घरोघरी गेले. यामुळे सहव्याधी असलेले रुग्ण लक्षात आले. संसर्गाची साखळी तोडण्याठी लॉकडाऊन हा प्रभावी उपाय आहे. पण ते करण्याची आमची इच्छा नाही. कोरोनावर आपण नियंत्रण मिळवत आहोत असे वाटत असतानाच आता पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. ‘मी जबाबदार’ मोहीम त्यासाठीच सुरू केली आहे.

कोरोना कालावधीमध्ये फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे काय करू नये हे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवभोजन – पोट भरणारी योजना

गोरगरिबांना केवळ 5 रुपयात थाळी देण्याची ‘शिवभोजन योजना’ सुरू केली. ती अजूनही सुरू आहे. ही योजना गोरगरीब जनतेचे पोट भरणारी योजना आहे. मी माझ्या राज्याशी बांधील असून जनतेची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनापासून बचावासाठी त्रिसूत्री आवश्यकच

लॉकडाऊन टाळायचे असेल तर मास्क वापरा, हात धुवा आणि शारीरिक अंतर ठेवा या त्रिसुत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाविरुद्धची लस घेतली तरीही त्रिसूत्रीचे पालन आवश्यक आहे.

कोरोना लसीकरण गतीने व्हावे यासाठी लसीकरण केंद्रे मोजकी न ठेवता ज्यांची क्षमता आहे अशा खासगी रुग्णालयांनाही परवानगी देण्याची मागणी आपण केंद्र शासनाकडे केली. त्यानुसार मुंबईत 29 रुग्णालयांना मान्यता मिळाली असून राज्यातही अशी व्यवस्था करण्यात येईल.

हमीच नाही तर हमखास भाव

पुढच्या वर्षी बाजारपेठेत कोणत्या पिकाला मागणी असेल ते विचारात घेऊन दर्जेदार उत्पादन आणि हमी भावच नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी मार्केटचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी वीज पंपाची योजना मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

पुढील 50 वर्षांचा विचार केल्यास कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे या जागेबाबत सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढूया असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्रामध्ये उद्योगांकडून थेट गुंतवणूक होते. त्यामुळे उद्योगांतील गुंतवणुकीत महाराष्ट्र नक्कीच आघाडीवर आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!