ठाणे दि. ९ : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या पाच तालुक्यामध्ये असणाऱ्या २८ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोव्हीड१९ लसीकरण केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी दिली.
शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षावरील वयोवृद्ध नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील भारत सरकारने दिलेल्या ठरावीक २०दिर्घकालीन व्याधीग्रस्त नागरिकांचे तिसऱ्या टप्प्यात लसीकरण करण्यात येत आहे. या वयोगटातील नागरिकांचे वेळेत लसीकरण पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
यामध्येवांगणी, बदलापूर,सोनावळा ,मांगरुळ, धसई, सरळगाव, किशोर, मोरोशी ,शिरोशी, शिवळा,म्हसा, तुळई ,दिवा- अंजूर, चिंबीपाडा, पडघा, कोन, किशोर दाभाड,वज्रेश्वरी,शेणवा,धसई शेद्रुण ,कसारा, वासिंद, निळजे, खडवली आदि प्राथमिक आरोग्य केंद्रासह उल्हासनगर सेन्ट्रल हॉस्पिटल, अंबरनाथ छाया हॉस्पिटल, दुबे हाँस्पिटल ,बदलापूर,ठाणे सिव्हिल हॉस्पिटल ,शहापूर व भिवंडी उपजिल्हा रुग्णालय, मुरबाड व टोकावडे ग्रामीण रुग्णालयआदि ठिकाणी लसीकरण सत्र सुरु करण्यात आली आहेत आणि पुढील आठवड्यात अघई व आनगाव येथे लसीकरण सत्रं सुरू होणार आहेत अशी माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.