डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पश्चिम येथील अंबिका नगर मध्ये राहणारे ६० वर्षांचे अशोक बर्वे यांनी स्वतःच्या आजारपणाला कुरवाळत न बसता स्वतःमधील कलेला वाव देत अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. विशेष म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीने ही प्रतिकृती साकारली असून यासाठी कागद, पुठ्ठे, टूथपिथ, तुटलेल्या दागिन्यांचे मणी वापरून १५ दिवसात त्यांनी ही प्रतिकृती तयार केली आहे.
ऑक्टोबर महिन्यात बर्वे यांच्या उखळीच्या सांध्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे बर्वे यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही हा काळ बिकट होता.मात्र साधारण तीन महिन्यानंतर त्यांनी बसून काहीतरी काम करावे याचा निर्धार केला. याच काळात राम चरित्र , अयोध्या मंदिराचे ध्वनिफीत, दृकश्राव्य त्यांच्या वाचण्यात आणि ऐकण्यात आले. रामावर असलेली श्रद्धा आणि राम भक्त म्हणून त्यांनी राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचे ठरवले. बर्वे यांनी सर्व ड्रॉइंग मटेरीयल मागवले. नियोजित श्रीराम मंदिर, त्याविषयीची चित्रे, दृकश्राव्य ध्वनिचित्रफीती हे किमान दहा वेळा पाहून, त्यावर अभ्यास करून मंदिराचा आराखडा आधी कागदावर तयार केला. त्यानंतर जुन्या रद्दी वह्यांमधील पाने घेऊन त्याच्या घट्ट सुरनळ्या तयार करून मंदिराचे खांब तयार केले. शर्टमधील पुठ्ठे, मिठाईचे खोके यापासुन बाकीचे स्ट्रक्चर उभे केले. हे सर्व पूर्ण झाल्यावर ॲक्रॅलीक रंगाने संपूर्ण मंदिर रंगविले.
आणखी काहीतरी वेगळे करावे या हेतूने त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे जुन्या इमीटेशन ज्वेलरीमधील मणी त्या मंदिरावर चिकटवून त्याला आणखी आकर्षक रुप दिले.कोणताही विशेष खर्च न करता ‘टाकाऊतून टिकाऊ’ यातून बर्वे यांनी ही एक ते सव्वा फूट उंचीची ही सुंदर प्रतिकृती तयार केली आहे. हे सर्व करत असताना बर्वे यांचा सर्व वेळही खूप छान गेला आणि शस्त्रक्रियेनंतरच्या या सक्तीच्या विश्रांतीमुळे आलेला शारिरीक, मानसिक थकवा, ताणही सहज दूर झाला.आता नवी दिल्ली येथील ‘अक्षरधाम’ची प्रतिकृती तयार करण्याचा बर्वे यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.