कल्याण ( शंकर जाधव ) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातील आरोपांबाबत केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत आज शून्य प्रहरात केली.
महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नाही. यापूर्वीही राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी पाठविलेल्या पत्रावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ते कंटाळून केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाले, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. एका सहायक पोलिस निरीक्षकाला १०० कोटी रुपये जमा करण्यास सांगण्यात आल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याने संबंधित प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते. मात्र, सायंकाळनंतर परिवर्तन झाले. या पार्श्वभूमीवर परमबीर सिंग यांच्या पत्रातील आरोपांवर चौकशी करण्याची गरज आहे. तरी या भ्रष्टाचाराची केंद्राद्वारे चौकशी करावी, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली.