नागरिकांना पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन
ठाणे दि.22: जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या संयुक्त विद्यमाने पाणी शुद्धता, पाणी वाचवा आणि पाणी सुरक्षितता या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जागतिक जलदिनाचे औचित्य साधत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ केला. यावेळी जलप्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार, कार्यकारी अभियंता( ग्रामीण पाणी पुरवठा) एच. एल. भस्मे, मुख्य लेखा व वित्तधिकारी सुभाष भोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार, कार्यकारी अभियंता( बांधकाम) नितीन पालवे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास) संतोष भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार, कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, समाजकल्याण अधिकारी सुनिता मते, उप उपअभियंता (भूजल सर्वेक्षण) संजय सुकटे, उप अभियंता ( लघू पाटबंधारे) डी. ए.पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी (नरेगा) समिना शेख आदी अधिकारी उपस्थित होते.
पाणी हा महत्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. या पाण्याचे महत्व अधोरेखित करून त्याचा सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी सोमवार पासून कल्याण ,अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी या पाचही तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये जल स्रोताचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण स्पर्धा घेणे, स्त्रोत व साठवण टाकी, जलकुंभ सफाई करणे, पाणी वाचविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जागतिक जल दिनाचे महत्व सांगून आवाहन करणे, शून्य गळती मोहीम शपथ घेणे अर्थात पाण्याचे महत्व पटवून देणे, जलसाक्षरता संदर्भात नाटिका, निबंध, चित्रकला स्पर्धा घेणे, आदी उपक्रम कोविड नियमांचे पालन करून घेण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) छायादेवी शिसोदे यांनी दिली.