डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्व -पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलावर गर्डर टाकण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गर्डरची पाहणी करत या कामाचा शुभारंभ केला. मे अखेर पर्यंत या पुलावर अपेक्षित २१ गर्डर बसवून पूल वाहतुकीसाठी खूला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे यावेळी पालिका आयुक्तांनी सांगितले.सप्टेंबर २०१८ पासून वाहतुकीसाठी बंद असलेल्या कोपर पुलावर एप्रिल २०२० रोजी हातोडा मारण्यात आला. यानंतर अनेक अडचणींवर मात करत पालिका प्रशासनाकडून जून्या पुलाच्या जागी नवा पूल उभारण्यात येत असून या पुलावर २१ गर्डर बसविले जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील ७ गर्डर सकाळी साडे नऊ वाजता दाखल झाले. यानंतर तातडीने हे गर्डर पुलाच्या पिलरवर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असून तीन टप्यात गर्डर आणून ते बसविले जाणार आहेत. पुलाच्या आजूबाजूला गर्डर ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे टप्याटप्याने हे गर्डर आणले जाणार आहेत.यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, माजी नगरसेवक मंदार हळबे, मुकुंद ( विशू ) पेडणेकर , विश्वनाथ राणे आदि उपस्थित होते.
कोपर पुलावर गर्डर टाकण्याच्या काम सुरू…मे अखेरपर्यंत पूल वाहतुकीसाठी खूला होण्याची अपेक्षा…
