ठाणे:-दिवा शहरातील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला असून मागील चार वर्षांत दिव्यातील एकाही मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले असून येथील नगरसेवकांनी लोकांना मनस्ताप देण्याचे काम केले आहे असा आरोप ठाणे भाजपचे उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी केला आहे.
दिव्यातील प्रमुख रस्ते असणाऱ्या साबे गाव रस्ता,दिवा आगासन रस्ता,मुंब्रा देवी कॉलनी रस्ता या रस्त्यांची मागील चार वर्षांत काय स्थिती आहे हे जनता बघत असून मागील चार वर्षात जर येथील नगरसेवक नागरिकांना धूळ मुक्त रस्ते देऊ शकत नसतील,प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण करू शकत नसतील तर हा दिव्यातील लाख नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे असे निलेश पाटील यांनी म्हटले आहे.
रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने व नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना धुळीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे याला सत्ताधारी यांचे चुकीचे नियोजन जबाबदार असल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे. दिव्यातील प्रमुख रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण व्हायला हवीत, सत्ताधारी लोकांनी कामाचा वेग वाढवायला हवा आणि लोकांना दिलासा द्यायला हवा,अन्यथा याविरोधात भाजपला आंदोलन करावे लागेल असा इशारा ही निलेश पाटील यांनी दिला आहे.