संगमनेर, 30 मार्च : प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. संगमनेर सत्र न्यायालयाने इंदोरीकर यांची या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोर्टात वाद विवाद सुरू होता. अखेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदोरीकर महाराज गेल्या काही महिन्यापासून वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. गेली काही महिने सरकारपक्ष आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर कसे दोषी आहेत ही बाजू मांडली. तर इंदोरीकर यांच्या वकिलांनी सक्षमपणे बाजू मांडत निकाल इंदोरीकर महाराजांच्या बाजूने लावला.
इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य पीसीपीएनडीटी एक्ट नुसार गुन्हा असल्याची बाजू सरकार आणि अंनिसच्या वतीने मांडण्यात आली. मात्र इंदोरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य कोणतीही जाहिरात नव्हती त त्यास ग्रंथाचा आधार होता, हे ग्राह्य धरत कोर्टाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला आहे.
‘आमची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच पायबंद घालायला हवा यासाठी या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी म्हटलं आहे.
इंदोरीकर महाराजांना आज मोठा दिलासा मिळाल्याने समर्थकांनी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला. हा सत्याचा विजय असल्याची त्यांची भावना आहे.