डोंबिवली ( शंकर जाधव ) : बालक मंदिर संस्थेच्या शाळांचे वैशिष्टय म्हणजे इथे मुलांना केवळ शिक्षण दिले जात नाही तर त्यांच्यावर संस्कार केले जातात. अर्थार्जन तर प्रत्येक जण करीत असतात पण सामजिकतेचे भान देणारे शिक्षण आम्ही देतो त्यामुळे आज सामजिक क्षेत्रात शाळेचे असंख्य विद्यार्थी कार्यरत आहेत असे प्रतिपादन बालक मंदिर संस्था सदस्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसाद मराठे यांनी केले. अक्षरआनंद न्यूज पोर्टलच्या ऑनलाईन गुढी पाडवा विशेषांकाचे प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अक्षरमंच प्रतिष्ठानने या काळात शाळेला मदत करून सामाजिकतेची गुढी उभारून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे असे सांगून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कोरोना काळात अनेक व्यवसाय बंद झाले , लोकांना पगार मिळाले नाहीत आणि सहाजिकच त्याचा परिणाम विद्यार्थी शिक्षणावर झाला. केवळ पैसे नाहीत या कारणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक निधी संकलनासाठी या गुढीपाडवा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले होते . विशेषांकातील जाहिरात आणि देणगीच्या माध्यमातून शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार यांचेकडे रुपये २५००० चा धनादेश अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी हेमंत नेहते यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी अक्षरआनंदचे संपादक हेमंत नेहते , सहसंपादक डॉ. प्रकाश माळी , स्नेहल सोपारकर , विश्वास कुळकर्णी आणि शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी या विशेषांकाचे अतिथी संपादक आणि बालक मंदिर शाळेचे प्रतिनिधी भालचंद्र ( मंगेश ) घाटे यांनी कोरोना काळात झालेली शाळेची स्थिती , शाळेतील प्रवेशाबाबतची पालकांची मानसिकता याबाबत माहिती दिली आणि शाळेस सहकार्य केले त्याबद्दल अक्षरमंच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.सदर उपक्रमासाठी नेहा पाठक , राहुल हजारे , अस्मिता जुवेकर , विजय चावरे , विनायक गोखले , योजना चौधरी , शशिकांत बळेल , विद्या घुले , योगेश जोशी , जयश्री धनकरघरे , विवेक द्याहाडराय , हेमंत नेहते , स्नेहल सोपारकर आणि कल्याण जनता सहकारी बँकेने विशेष सहकार्य केले.
सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांबाबत नेहमी नवनवीन संकल्पना अमलात आणणाऱ्या डॉ. योगेश जोशी यांनी महाराष्ट्र जडण घडण कोश या नवीन संकल्पनेची माहिती उपस्थितांना दिली आणि या उपक्रमाचे माध्यमातूनही बालक मंदिर संस्थेच्या शैक्षणिक निधीसाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आणि कोरोना नियमावली पाळून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी महाराष्ट्र जडण घडण कोश उपक्रमाच्या अभ्यास मंडळात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९७५७०७७६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.