नवी मुंबई दि. 22 :– कोकण भवन (मिनी मंत्रालय) इमारतीतील कार्यरत 45 वर्षावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी 90 टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक पहिली लस घेतली असल्याचे कोकण भवनातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इमारतीतील सर्वच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक पहिली लस घेतली आहे.
शासनाच्या नव्या निर्देशानूसार कोकण भवन इमारतीत प्रवेश करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे तापमान तपासले जात असून अभ्यागतांसाठी आवश्यक असेल तरच प्रवेश दिला जातो आहे. प्रत्येक मजल्यावर हात धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, सॅनिटायझरचा वापर आणि मास्क घालणे बंधनकारक केले आहे.
शासन निर्देशानुसार उद्यापासून विविध विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती 15 टक्के असणार आहे. कोकण भवन इमारतीत कोकण विभागाची विभागीय कार्यालये असून जनतेची कामे थांबू नये यासाठी वर्क फ्रॉम होम काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना काळात आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.