डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना रुग्णाला व्हेंटीलेटरची गरज भासल्यास पालिकेची आरोग्य यंत्रणा अश्या रुग्णांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते.परंतु केडीएमसीच्या डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल कोरोना रुग्णालयातील १५ पैकी ७ व्हेंटीलेटर बंद असल्याचे भाजपाच्या निदर्शनात आले.चार दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सदर रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य यंत्रणेबाबत माहिती घेतली असता येथील काही व्हेंटीलेटर बंद असल्याचे निदर्शनात आले.रुग्णांना वेळेवर व्हेंटीलेटर मिळणे आवश्यक असताना गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालयातील १५ पैकी ७ व्हेंटीलेटर बंद असतील ते हा आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.भाजपच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी सदर रुग्णालयात जाऊन याचा वाचा विचारला.
भाजप डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी,माजी नगरसेवक निलेश म्हात्रे,राजन आभाळे,मुकुंद ( विशू ) पेडणेकर आणि सुरेश सोनी यांनी केडीएमसीच्या डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल कोरोना रुग्णालयात येथील व्यवस्थापकांची भेट घेतली.या रुग्णालयात १५ पैकी ७ व्हेंटीलेटर हे गेल्या आठ दिवसांपासून बंद आहेत.कोरोनाच्या या संकटात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ७ व्हेंटीलेटर बंद असणे हे बरोबर नाही. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे होते.७ व्हेंटीलेटर बंद झाले ते समजताच नव्याने लवकरात व्हेंटीलेटर लावणे आवश्यक होते असे भाजपच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचे म्हणणे होते.माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी पालिकेच्या डोंबिवली येथील जिमखाना कोरोना रुग्णालयात एका रुग्णाला बेड साठी तब्बल चार तास रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकेत ऑक्सिजन लावून वाट पहावी लाग्ल्याबाबतचा जाब विचारला होता.तर रुग्णालयाचे व्यवस्थापक राहुल घुले यांना विचारले असता त्यांनी रुग्णालयातील सात व्हेंटीलेटर बंद असून आठ सुरु आहेत. पालिका प्रशासनाकडून हे व्हेंटीलेटर दुरुस्तीसाठी धाडत नव्याने सहा व्हेंटीलेटर मागविण्यात आले आहे.हे व्हेंटीलेटर जोडण्यासाठी चार ते पाच दिवसांचा अवधी लागणार आहे असल्याचे सांगितले.
दरम्यान पालिका प्रशासन कोरोना संकटात रुग्णांसाठी दिवसरात्र आरोग्य सेवा देत असली तरी पालिकेच्या कोरोना रुग्णालयात व्हेंटीलेटर बंद आहेत का चालू आहेत याची वेळेवर माहिती घेणे आवश्यक आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.