कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याण पश्चिमेच्या लालाचौकी परिसरात असणाऱ्या आर्ट गॅलरी कोवीड रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाबाबत डॉक्टरांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप माजी आमदार तथा भाजप नेते नरेंद्र पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडेही तक्रार करत संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. केडीएमसीच्या लालचौकी येथील आर्ट गॅलरी कोवीड रुग्णालयात एका कोवीड रुग्णावर उपचार सुरू होते. मात्र या रुग्णाचा मृत्य झाल्यानंतरही त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती इथल्या डॉक्टरांनी आपल्याला दिल्याचे माजी आमदार पवार यांनी सांगितले. आपल्यासारख्या माजी आमदाराला जर अशी खोटी माहिती दिली जात असेल तर सामान्य नागरिकांचे काय? हा अत्यंत धक्कादायक असा प्रकार असून या कोवीड रुग्णालयात किती भोंगळ कारभार सुरू असेल आदी प्रश्नही पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे उपस्थित केले आहेत.
तर कोवीड रुग्ण कमी करण्यासाठी आपण करत असलेल्या कामाला यश येताना दिसत असून डॉक्टरांच्या अशा हलगर्जीपणामुळे त्याला गालबोट लागत असल्याचे सांगत अशा बेजबाबदार डॉ. अमित गर्ग आणि डॉ. आलम यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही नरेंद्र पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यावर आपण याबाबत माहिती घेऊन संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाईचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिल्याचेही पवार यांनी सांगितले.