डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचा संसर्ग अतिवेगाने वाढत असून वेळेत उपचार न केल्याने आपले डोळे गमवावे लागल्याच्या, तसेच काही रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडत आहेत.त्यामुळे या संसर्गावर वेळेतच उपचार व नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा प्रशासन तसेच कल्याण लोकसभा मतदार संघातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोनाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्या कोरोनासोबतच जीवघेण्या म्युकरमायकोसिस या फंगल इंफेक्शनचा धोकाही वाढताना दिसत आहे. या संसर्गामुळे चेहऱ्याभोवतीच्या हाडांच्या पोकळीमध्ये म्युकरमायकोसिस हे फंगल इंफेक्शन वाढत असून याचा परिणाम डोळे, मेंदु यावर होत आहे. खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांसमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्येही याकडे लक्ष वेधले होते. डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यांतून पाणी येणे आदी लक्षणे आढळत आहेत. या संसर्गाचे वेळेत निदान व्हावे, यासाठी सदर लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ कान, नाक, घसा तज्ञांकडून तपासणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.म्युकरमायकोसिसचा धोका वेळीच ओळखून राज्यात त्याबाबत उपाय योजना करण्याचे गरजेचे असल्याचे सांगत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या आजारावर शस्त्रक्रिया करण्याकरिता प्रत्येक क्षेत्रातील जंबो कोविड सेंटर मध्ये स्वतंत्र शस्त्रक्रिया विभागाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून रुग्णांना त्वरित उपचार घेता येईल, तसेच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना रुग्णालयात प्रविष्ट करून न घेता एक स्वतंत्र follow up ओ.पी.डी (OPD) विभाग स्थापन करावे, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली आहे.
म्युकरमायकोसिस अर्थात ‘ब्लॅक फंगस’, सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर काळ्या बुरशीचे शेकडो रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहे. यामुळे कोरोना झाल्यानंतर अनेकांना या आजाराने ग्रासले असून रुग्णांना अॅमफोटेरीसिन – बी (Amphotericin-B) या औषधाची गरज भासत आहे. या औषधाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यासाठी या औषधाचा जास्तीत जास्त पुरवठा करणे, तसेच कान नाक घसा (ENT Specialist) तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्यासाठी शासन स्तरावर समन्वय साधून नियुक्ती करण्याची मागणीही खा. डॉ. शिंदे यांनी केली आहे.