महापालिका आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेश
ठाणे(१८) :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सी-१ या वर्गवारीतील अतिधोकादायक इमारती खाली करून त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना दिले. त्याचबरोबर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.
शहरात पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारतींमुळे कोणतेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे प्रभाग समितीनिहाय सी १, सी २, आणि सी २ अ गटातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला.
प्रभागसमितीनिहाय धोकादायक इमारतींची यादी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. लोकमान्यनगर-सावरकरनगर, कळवा, माजीवाडा-मानपाडा, दिवा, मुंब्रा, उथळसर, वर्तकनगर, नौपाडा आदी प्रभागसमितीमधील अतिधोकादायक सी १ इमारती खाली करून तात्काळ तोडून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.
त्याचबरोबर सद्यस्थितीत रस्त्यांच्या दुरूस्तीची जी कामे सुरू आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच घनकचरा विभागाच्यावतीने प्रत्येक प्रभागसमितीनिहाय साफसफाई करण्यासोबत शहरातील संपूर्ण नालेसफाई ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्या ठिकाणी चेंबरवर झाकणे नाहीत तेथे तात्काळ चेंबरची झाकणे बसविणे, चर बुजविणे व खड्डे बुजविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावर पावसाच्या पाण्याने कचरा वाहून आला असून, झाड्यांच्या पडलेल्या फांद्या, कचरा तात्काळ उचण्याचे आदेश देखील महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.