डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ञांकडून वारंवार देण्यात येत असून या लाटेत लहान मुले अधिक प्रमाणात बाधित होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेशी सामना करत रुग्णसंख्या कमी करण्यात मनपा प्रशासनाला यश आले. पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता संभावित तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लहान मुलांसाठी हाय फ्लो यंत्रणा उभारणे, नवजात शिशु देखभाल विभाग तसेच लहान मुलांकरिता अतिदक्षता विभाग उभारणे आवश्यक असून या दृष्टिकोनातून पुढाकार घेत कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली येथे सर्व सुविधांनी सुसज्ज बालरोग व नवजात शिशू देखभाल विभाग उभारण्यात येत असून मंगळवारी यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत शास्त्रीनगर रुग्णालयाची पाहणी करत बालरोग व नवजात शिशू देखभाल विभाग उभारण्याबाबत प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या.
शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये बालरोग व नवजात शिशू देखभाल विभाग सुरु करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांची भेट घेत मनपा प्रशासनाला १.२५ कोटींचा निधी खासदार निधीतून उपलब्ध करुन दिला होता. कोरोनाची साथ संपल्यानंतरही सदर बालरोग व नवजात शिशू देखभाल विभाग कार्यान्वित राहणार असून कल्याण-डोंबिवली महापालिकेस कायमस्वरुपी बालरोग विभाग असलेले रुग्णालय मिळेल आणि याचा फायदा कल्याण, डोंबिवली सह नजीकच्या शहरातील व खेड्यांमधील लहान बालकांना होईल, असे मत यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्रात सर्वत्र कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी लागणारी औषध, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर कमी पडू नये यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच अनुषंघाने युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने एकूण १० व्हेंटिलेटर उपकरणं विनामूल्य उपलब्ध देण्यात आली असून यापैकी कल्याण-डोंबिवली प्रशासनास ५ व्हेंटिलेटर्स सुपूर्द केले.
याप्रसंगी माजी महापौर विनीता राणे,स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे,शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, सदानंद थरवळ, विश्वनाथ राणे आणि मनपा वैद्यकीय अधिकारी आश्विनी पाटील उपस्थित होते.