दिवा:- कोरोनाचे गंभीर संकट व कायम असणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन दिवा शहरातील नागरिकांचे मागील 6 महिन्यांचे पाणी बिल माफ करावे अशी मागणी ठाणे भाजपचे उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे ईमेलद्वारे केली आहे.
पालिका आयुक्तांना पाठवलेल्या ईमेल मध्ये निलेश पाटील यांनी म्हटले आहे की,एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे दिव्यात अनेक पाणी बिल भरणाऱ्यांना मागील काही महिने पुरेसे पाणी मिळत नाही.अनेक भागात पाणीटंचाई आहे.परिणामी ठाणे महापालिकेने दिव्यातील नागरिकांची मागील सहा महिन्यांची पाणी बिल माफ करावीत अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
दिव्यातील बहुतांश नागरिक हे सामान्य कुटुंबातील नोकरदार वर्ग आहे. मागील वर्षभरात लॉक डाऊन मध्ये अनेक महिने गेल्याने अनेकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे नोकरी व्यवसायावर गदा आली असताना घर चालवणे सामान्य माणसाला अवघड झाले आहे.अशात दिवा शहरात वर्षाचे बारा महिने पाणीटंचाई असताना आणि अनेक नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असताना नागरिक हवालदिल झाले आहेत याकडे भाजपचे निलेश पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
काही इमारती या पाणी बिल भरत असतानाही पाणी पुरवठा बाबत चुकीच्या नियोजनामुळे अनेकांना मागील काही महिन्यांपासून पाणी मिळत नाही त्यांना पाणी विकत घ्यावे लागते.दिव्यातील नोकरदार वर्गाचा विचार करता व येथील कायमच पाणी समस्या असल्याचा मुद्दा लक्षात घेता कोरोना संकटात दिव्यातील नागरिकांचे मागील 6 महिन्यांचे पाणी बिल माफ करावे अशी विनंतीनिलेश पाटील यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.