मोखाडा (दीपक गायकवाड – ): मोखाडा तालुक्यातील मोखाडा विहीगाव कसारा राज्यमार्ग क्रमांक 34 वर टेलीफोन मोबाईल कंपन्यांनी केबल टाकल्याने साईडपट्टी नेस्तनाबूत झालेली आहे. मागील वर्षाच्या पावसाळ्यात साईडपट्टी वाहून खचलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा मोबाईल केबलच्या ठेकेदारांनी त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे अतिवृष्टीत रस्ता वाहून जावून वहातूक ठप्प होण्याचा संभव आहे.
याबाबत मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती व आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी तब्बल वर्षभर पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधीत विभाग अथवा केबल ठेकेदार यांचेकडून दुरुस्ती बाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रस्तुत राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वहातूक होत असते त्याशिवाय नाशिक मुंबई महामार्गावर जेव्हा केव्हा अपघातवश वहातूक कोंडी होत असते त्या प्रत्येक वेळी पर्यायी मार्ग म्हणून याच राज्य मार्गाचा उपयोग केला जात असतो. असे असतानाही संबंधीत विभाग या बहुपर्यायी रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे.
त्याशिवाय या राज्यमार्गा लगतच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा जलाशयाला जोडणारा कडूचीवाडी – कोचाळा रस्त्यावर मागच्या पावसाळी हंगामात मोरी तुटल्याने रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. याबाबतही प्रदीप वाघ यांनी प्रदीर्घ पाठपुरावा केला आहे. परंतू त्याबाबतही कारवाई शुन्य आहे. या रस्त्याचे अद्ययावतीकरणाचे काम प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतून झाले असले तरी मुळ जिल्हापरिषदेच्या अखत्यारीत हा मार्ग येत असतांनाही वर्षभरापासून बेदखल पडलेल्या रस्त्याची जबाबदारी घेण्यात आलेली नाही.
प्रस्तुत रस्त्यावरुन स्वस्त धान्य, रॉकेल या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबरोबरच आरोग्य सेवा, विद्यार्थी यांचेसह मध्यवैतरणा प्रकल्पाकडे जाणा-या बृहण मुंबई महानगरपालिकेची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते मात्र मोखाडा तालुक्यात होणा-या मुसळधार पावसामुळे अर्धवट तुटलेली मोरी समूळ वाहून जाणार आहे. पर्यायाने आदिवासींचे आरोग्य धोक्यात येवून पोटापाण्यासह, शैक्षणिक व मध्यवैतरणावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे या दोनही रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास व्यापक जन आंदोलन उभे करण्याचा इशारा वाघ यांनी दिला आहे.