४५० विद्यार्थ्याचे सिबीएससी ऐवजी स्टेट बोर्डाचे शिक्षण सुरु करणार..
डोंबिवली ( शंकर जाधव): डोंबिवलीजवळील रिव्हरवूड पार्क (खिडकाळी ) येथील सीताबाई के.शहा मेमोरियल शाळेबाहेर पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभार विरोधात सोमवारी केलेल्या प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलनमुळे अखेर शाळा व्यवस्थापन नमले.सिबीएससी बोर्ड ऐवजी स्टेट बोर्ड प्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येईल. आश्वासन शाळा व्यवस्थापन कडून मिळाल्यानंतर पालकांनी आंदोलन स्थगित केले आहे.
या शाळेत विद्यार्थी आहेत ते स्टेट बोर्ड प्रमाणेच शिक्षण घेतील त्यामुळे काही गोंधळ झाला असेल तो दूर केला पाहिजे असे वक्तव्य शाळा संचालक शहा यांनी केल्यामुळे आंदोलन स्थगित केली अशी माहिती आंदोलनकर्त्यानी दिली.मंगळवारी आंदोलन स्थळी मनसे आमदार प्रमोद (राजू ) पाटील आणि शाळा संचालक शहा यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन शाळा पालक व आंदोलनकर्ते यामध्ये चर्चा झाली. विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड प्रमाणे शिक्षण मिळेल असा विश्वास संचालकांनी दिल्याने आंदोलन स्थगित केल्याचे सांगण्यात आले.याबाबत काँग्रेसचे पालघर जिल्हा प्रभारी संतोष केणे म्हणाले, जिल्हा परिषदेने शाळा संचालकांना दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे.शाळा व्यवस्थापकांना आता कलेक्टरचा आदेश मान्य करावा लागला आहे.पालकांची आणि ग्रामस्थांची मागणी त्यांना मान्य करावी लागली आहे. संघटित झालेला पालकवर्ग आणि या विभागाचे बांधव यांनी घेतलेल्या गंभीर भूमिकेमुळे न्याय मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक कुटुंब संकटात आहे. त्याच वेळी शिक्षणात व्यत्यय ही गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ही मागणी होती स्टेट बोर्ड पाहिजे हे साध्य झाला आहे.लालबावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष कॉ.काळू कोमस्कार म्हणाले,लॉकडाऊन काळात शिक्षण व्यवस्थेत सरकारच्या माध्यमातून अनेक आदेश दिले आहेत की वसुली करू नका पण शाळाचालक बऱ्याच प्रमाणात मुजोरी करतात हे सिद्ध झाला आहे.खर तर शाळा चालकांना नियमात बांधून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ही वेळ आली आहे.
गेल्या सहा महिन्यापासून सीताबाई शाळा चालकांनी स्टेटबोर्डची शाळा बंद करून सीबीएससी बोर्डची शाळा सुरू करायचा घाट घातला होता.त्यासाठी शाळा बंद केली.कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद केले.या विरोधात पालक एकत्र येऊन त्या विरोधात आवाज उठविला.त्यासाठी काही बैठका घेण्यात आल्या. आमदार,खासदार,लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत स्टेट बोर्ड चालू करायचा नाही ही ठाम भूमिका संचालकांनी घेतली होती. सीबीएससीच चालू करायचा असं ठाम होत परंतु गेले दोन दिवस आम्ही केलेल्या आंदोलनामुळे त्याचा प्रभाव पडून प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली आणि शाळा संचालक स्वतः आमदार राजू पाटील यांच्यासह शाळेला भेट देऊन आमच्या समवेत चर्चा केली.यामध्ये स्टेट बोर्ड चालू ठेवून जशी पूर्वी शाळा सुरू होती त्याचप्रमाणे येथील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल असे सांगितले.सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची माझी जबाबदारी आहे असे सांगितले.आम्ही हे अनोखं आंदोलन मागे घेतले आहे. पण पुढे काही प्रश्न निर्माण झाला तर मात्र पुन्हा शाळा संचालक विरोधात आंदोलन करणार पालक- राम म्हात्रे म्हणाले, अन्याय विरोधात आंदोलन केले.या आंदोलनासाठी कॉ.काळू कोमस्कार आणि ऍड.रामदास वायंगणी यांच्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले. आमची स्टेट बोर्डची मागणी पूर्ण झाली आणि शाळा सुरू होईल याचा आनंद झाला. पालक- उत्तम पवार म्हणाले,आमची जी मागणी होती दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले पाहिजे ते शाळेतील संचालकांनी मान्य केले आहे.यामुळे आम्हाला व पालकांना आनंद झाला आहे. आम्ही रंगवलेली स्वप्ने साकार होतात त्याचा आज आनंद होत आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आंदोलनाची दाखल
खिडकाळी शिवसेना शाखाप्रमुख दिपेश पाटील यांनी सदर आंदोलनाबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कळवले असता त्यांनी आंदोलनाची दाखल घेतली. ठाकरे यांनी युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांना याबाबत लक्ष देण्यास सांगितले. दुर्गे यांनी ठाणे शिक्षणाधिकारी यांना सदर आंदोलनाबाबत निर्णय घेण्याबाबत कळवले. तसेच राज्याची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र देऊन या शाळेतील ४५० विद्यार्थांचे शैक्षणिक वर्ष आणि प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलनाबाबत माहिती दिली.