पत्रीपुलाचा रस्ता गेला वाहून सबंध गाव झाले बेदखल
आरोग्याचा प्रश्न गंभीर
मोखाडा ( दीपक गायकवाड ) : मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या आम्ले गावाला जोडणारा रस्ताच अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे.त्यामुळे येथील रहिवाशांना अनंत अडचणींशी सामना करावा लागणार आहे. बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन दळणवळण सुरळीत करण्याची मागणी आम्ले वासीयांनी केली आहे. मागील 2 वर्षापूर्वी नदीच्या पलिकडे वसलेल्या आम्ले गावाचा पत्रीपुलच अतिवृष्टीमुळे समूळ धुवून नेला होता. तत्कालीन परिस्थितीत येथील जनतेला तब्बल 4 महिने संपर्क विहीन होवून अक्षरशः बेटावरचे जीवन जगावे लागले होते.त्यावेळी येथील जनतेला वनवास भोगावा लागला होता.तशीच परिस्थिती आत्ताही निर्माण झाली आहे.त्यामुळे दैनंदिन जीवनाशी निगडित अडचणी सोडवायच्या कशा? असा सवाल निर्माण झाला आहे.
सन 2020 मध्ये पत्रीपुलाला ( खेटून ) व डांबरी रस्त्याला जोडण्यासाठी नदीच्या प्रवाहाला समांतर असा फक्त मातीचा भराव घालून केवळ मलमपट्टी केली आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर भरावही वाहून गेला आहे. याठिकाणी दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असते हे माहिती असूनही बांधकाम विभाग केवळ टोपल्या टाकण्याचे काम करीत असल्याचा आरोप येथील रहिवासी पांडूरंग वारे यांनी केला आहे.
हलगर्जीपणा आदिवासींच्या मुळावर
याठिकाणी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक होते. मात्र तसे न करता बांधकाम विभागाने फक्त भराव टाकून हात झटकले आहेत. परिणाम स्वरुप 400 लोकवस्ती असलेले आमचे अख्खे गावच वेठीस धरले असल्याच्या प्रतिक्रिया आम्ले ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
आरोग्याचा प्रश्न होणार गंभीर
नदीच्या विस्तीर्ण पात्रावर रहदारी साठी असलेल्य एकमेव पत्रीपुलाला जोडणारा रस्ताच भुईसपाट झाला आहे. त्यामुळे प्रामुख्याने शिक्षणासह आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात प्रसूती बरोबरच पावसाळ्यात उदभवणारे आजार ढाळ – वांती आदि साथीचे आजार झाल्यास या ठिकाणी कोणतीही आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी केवळ अशक्य असून रस्त्या अभावी डोली करुन आणणेही कठिन असल्याने वस्तुस्थिती लक्षात घेऊन बांधकाम विभागाने तातडीने युद्धपातळीवर दळणवळण सुरळीत करण्याची गरज आहे. “अन्यथा त्यामुळे होणा-या संभाव्य दुर्घटनांना सर्वस्वी संबंधीत सर्व विभागच जबाबदार रहातील ” , असे येथील ग्रामस्थ पांडूरंग वारे यांनी सांगितले आहे.