फेरीवाल्यांना हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करा, मुंडेंचा आयुक्तांना ईमेल !
दिवा :- कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा दिवा आगासन हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की फेरीवाल्यांना आंदण देण्यासाठी असा सवाल करत भाजपचे रोहिदास मुंडे यांनी फेरीवाले हटवून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा असा ईमेल आयुक्तांना पाठवला आहे.

आयुक्तांना दिलेल्या ईमेल मध्ये रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे की, ठाणे महापालिका मार्फत बनविण्यात येत असलेल्या या रस्त्या बाबत आपले आभार…मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी बनविण्यात येत आहे की फेरीवाल्यांना गाड्या लावण्यासाठी बनविण्यात आला आहे याचा खुलासा आपण करावा अशी उपहासात्मक विनंती मुंडे यांनी केली आहे.
दिवा टनिंग ते ग्लोबल स्कुल या दरम्यान या दोन्ही लेन पूर्ण झाल्या आहेत. दिव्यात वाहतूक कोंडी याच रस्त्यावर होते म्हणून रुंदीकरण करण्यात आले, राहत्या इमारती तोडण्यात आल्या. मग असे असताना मोकळ्या रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्या ऐवजी त्यावर हातगाड्या लावण्याची परवानगी नेमकी कोण देत आहे याची आपण चौकशी करावी. तातडीने दिवा शहरातील प्रमुख रस्त्यावरील हातगाड्या हटविण्यात याव्यात. जर दिव्यातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या हातगाड्या वर कारवाई करण्यात आली नाही तर याविरोधात आंदोलन केले जाईल याची आपण नोंद घ्यावी असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.