डोंबिवली ( शंकर जाधव ) : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव दिले पाहिजे यासाठी दिवा पाटील विमानतळ नामकरण कृती समिती कार्यरत आहे. या मागणीसाठी कृती समितीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. डोंबिवलीजवळील मानपाडा ग्रामीण विभागात या मशाल मोर्चासाठी भूमिपुत्र एकवटले होते.
मानपाडा येथील मानपाडेश्वर मंदिराच्या पटांगणात भूमिपुत्र स्त्री-पुरुष तरुण-तरुणीसह जेष्ठ नागरिक एकत्रित झाले होते. यावेळी कृती समितीच्या माध्यमातून गुलाब वझे यांनी मोर्चाचे नेतृत्व केली. यावेळी गजानन मंगरूळकर, दत्ता वझे, रंगनाथ ठाकूर, राजेंद्र गोरे, हरी देसले आदी पदाधिकाऱ्यांसह भूमिपुत्रांनी मशाल प्रज्वलित करून तीचे पूजन करताच “उपस्थित जनसमुहांनी ” कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय राहणार नाय” अशा घोषणा दिल्या. दरम्यान गुलाब वझे यांनी नवी मुंबई विमानातळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचाच नांव का दिले पाहिजे याबद्दल विस्तृत माहिती दिली. त्यानंतर नियोजित रांगेत आणि कोरोना महामारीबाबत असलेल्या नियम-अटी चे पालन करून मोर्चा संपूर्ण गांवपरिसरात काढण्यात आला. सदर मोर्चाचा समारोप शेवटी मानपाडेश्वर मंदिरात करण्यात आला. सरकारने यानंतरही सुद्धा भूमिपुत्रांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही तर नवी मुंबई विमानतळ जागेवर भूमिपुत्रांचे उग्र आंदोलन होईल असा इशारा यावेळी दिला.