डोंबिवली ( शंकर जाधव ) : शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कोविड लसीकरणाचे दोन डोस पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे. सदर नागरिकांना रेल्वे पास मिळणे सुकर व्हावे याकरीता त्यांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरीता महापालिका कार्यक्षेत्रात कल्याण, डोंबिवली, कोपर, टिटवाळा, आंबीवली, शहाड,ठाकुर्ली या रेल्वे स्थानकांवर महापालिकेने सकाळी ७ ते दुपारी ३ व दुपारी ३ ते रात्री ११ या दोन सत्रात महापालिका कर्मचा-यांचे मदत कक्ष उभारण्यात आले आहेत.
बुधवारी सकाळी ७ वाजता महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर महापालिकेचे कर्मचारी हजर होते. या पहिल्या सत्रात कल्याण पूर्व रेल्वे स्थानक येथे १६८ , कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक येथे २८४ , डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक येथे ८२७ , डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक येथे ६०७ , ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर १९९, शहाड रेल्वे स्थानकावर १५ , आंबिवली रेल्वे स्थानकावर ५१ , कोपर रेल्वे स्थानकावर १५० , टिटवाळा रेल्वे स्थानकावर २०४ अशा एकुण २५०६ नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली. दुपारच्या दुस-या सत्रातही नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. नागरिकांनी सदर पडताळणीसाठी गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.