डोंबिवली ( शंकर जाधव ) : गेल्या ७४ वर्षांचा ठाणे जिल्ह्याचा वनवास संपला असून अखेर ठाणे जिल्ह्याला न्याय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादामुळे मला हे मंत्रिपद मिळाले असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्य मंत्री खासदार कपिल पाटील यांनी केले.
डोंबिवली येथील मानपाडा रस्त्यावरील मानपाडेश्वर मंदिरात २७ गाव सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीतर्फे यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला . या सत्काराला उत्तर देताना त्यांनी दि. बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी प्रयत्न करणार असून समस्यांचे निराकरण करताना मी पूर्वीही तुमच्याबरोबर होतो आणि आताही तुमच्याबरोबर आहे असे सांगितले. पंतप्रधानांना इथल्या समस्या लवकरात लवकर सुटाव्या असे वाटत असल्याने त्यांनी मला ही संधी दिली. इतकेच नव्हे तर ज्या जनते मुळे तुम्हाला ही संधी मिळाली आहे त्यांना जाऊन भेटा असे आदेश देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याने जन आशिर्वाद यात्रेच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येण्याचे ठरविले असे त्यांनी सांगितले. यावेळी गुलाबराव वझे यांनी २७ गावाच्या मालमत्ता करात १० पटीने अधिक वाढ करून भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा प्रकार महापालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे २७ गावांची नगरपालिका वेगळी करण्याची गरज असल्याचे सांगत गेली अनेक वर्ष यासाठी लढा देत असल्याची माहिती कपील पाटील यांना संघर्ष समितीने दिलेल्या पत्राद्वारे दिली. कल्याण शिळ रस्त्यावर कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने जन आशिर्वाद यात्रा स्वागतासाठी रस्तोरस्ती फलक लावले आहेत.
माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, गुलाब वझे, गंगाराम शेलार, अर्जुन चौधरी, विश्वनाथ रसाळ , गजानन मग्रुळकर, चंद्रकांत पाटील, वासुदेव गायकर, विजय भाने, दत्ता वझे, भगवान पाटील, रंगनाथ ठाकूर , बाळाराम मा, भास्कर पाटील आदी उपस्थित होते.