डोंबिवली ( शंकर जाधव ) : विविध पोलिस ठाण्यात घरफोडीचे १६ गुन्हे दाखल झालेल्या एका तडीपार आरोपीला अटक करण्यात डोंबिवली रामनगर पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपिअने यातील अनेक गुन्ह्यात शिक्षा भोगली असल्याची माहिती डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डोंबिवलीत एका दुकानात मोबाईल चोरी करताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपीचा चेहरा कैद झाला आहे.
सुरज रामदास चव्हाण असे अटक आरोपीचे नाव असून तो खडवली येथील संजय पाटोळे चाळीत राहत होता.सुरजने २८ ऑगस्ट रोजी डोंबिवलीतील महावीर नाॅव्हेल्टी मोबाईल दुकानाचे टाळे तोडून शटर उचकटून दुकानातील ९७,५६९ किमतीचे ७ मोबाईल चोरले होते.डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात संगोई वय यांनी दुकानातील चोरीचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस त्याच्या मागावर होते.३१ तारखेला सुरज डोंबिवली पुर्वेकडील ९० फीट रोडवर फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक करून बेड्या ठोकल्या सुरजकडील चोरी केलेले मोबाईल,एक एल.ए.डी टीव्ही, चांदीचे भांडे, ६,७०० रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केले.आरोपी सुरजला कल्याण सत्र न्यायालयात ४ सप्टेबर पर्यत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या आरोपीवर कल्याण मधील महात्मा फुले पोलिस ठाणे, मुंबईतील पायधुनी पोलिस ठाणे, एल.टी.मार्ग पोलिस ठाणे, माता रमाबाई पोलिस ठाणे येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे,पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलिसआयुक्त जयराम मोरे,प्रभारी वपोनि समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे, पोलिस हवालदार शंकर निवळे,पोलिस नाईक विशाल वाघ,गणेश गीते, सोमनाथ पिचड,दिलीप कोती,पोलिस शिपाई वैजीनाथ रावखंडे,जालिंदर साळुंके,निलेश पाटील यांनी सदर कामगिरी केली.