महाराष्ट्र मुंबई

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई, दि. ७ – कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

सध्या निर्बंध वाढविण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. संख्या कुठे वाढते आहे? का वाढते आहे, यावर विशेष लक्ष आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी स्पष्ट केले. नागपूरच्याबाबतीत तेथील आकडे आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल तेव्हा लावणार निर्बंध

आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, ऑक्सिजनच्याबाबतीत गेल्या वेळी १३०० मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती, आता १४०० ते १५०० मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे. ऑक्सिजनचे ४५० प्लान्टची उभारणी करण्यात येत असून त्यातील अडीचशे प्लान्टस उभारले आहेत, उर्वरित प्लान्ट लवकरच कार्यन्वित होतील. ऑक्सिजनची साठवणूक क्षमता वाढविण्यासह ड्युरा सिलेंडर्सची संख्या वाढवत असून त्यामुळे आपल्याकडे १९०० ते २००० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजनची उपलब्धता होऊ शकते. केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करताना खूप मोठा आकडा सांगितला आहे. ज्यादिवशी ७०० मेट्रिक टनच्या वर ऑक्सिजनचा वापर होईल त्यावेळी निर्बंध सुरू करू अशा प्रकारची अधिसूचना आरोग्य विभागाने काढली आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असे सांगून ही दक्षता लोकांच्या जीवितेच्या दृष्टिकोनातून घेणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

५ जिल्ह्यांत एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्ण

केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे. आज राज्यातील ४ ते ५ जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्णसंख्या आहे, त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचे पालन करावेच लागेल तरच तिसरी लाट रोखता येईल असेही आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

एका दिवसात १२ लाखांपेक्षा अधिक लसीकरण

एका दिवसात १२ लाखांच्या वर लसीकरण करून आपण आपली क्षमता सिद्ध केली आहे, लस अजून उपलब्ध झाली तर १२ ते १४ लाख लसीकरण रोज करता येईल. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितता देता येऊ शकेल आणि पर्यायाने तिसऱ्या लाटेची दाहकता कमी होईल. मोठ्या प्रमाणात लसीकरण करून तिसरी लाट थोपवायची असेल तर त्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या अधिसूचनांचे पालन करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

आगामी गणेशोत्सवासाठी शुभेच्छा देतानाच शासनाच्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्याची जाणीव करून दिली आहे, त्यामुळे येथील मंडळांनी, गणेश भक्तांनी शिस्तबद्धपणे कोविड नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन शेवटी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!