गळक्या कार्यालयात बसूनच कर्मचाऱ्यांनी केले काम
डोंबिबली ( शंकर जाधव ) : पावसामुळे पत्रे तुटून गळती होते ही बाब सामान्य नागरिकांसाठी नेहमीचीच गोष्ट आहे. परंतु करोडो रुपयांची उलथापालथ करणाऱ्या वीज वितरण कंपनीवर अशी वेळ येणे ही बाब गंभीर आहे. चक्क पावसामुळे फांदी पडते आणि पत्रा फुटतो आणि वीज वितरण कार्यालयात पावसातही धार पडते आणि अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. ही बाब सत्य असून पावसाळ्यानंतर कार्यालयाची दुरुस्ती होणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विजय दुधभाटे यांनी दिली आहे.
पावसाळ्यात झाडाच्या फांद्या पडून विद्युत प्रवाह बंद होऊ नये म्हणून वीज वितरण कंपनी पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करते. मात्र आपल्याच कार्यालयावर असलेली झाडाची फांदी तोडण्यास महावितरण विसरले आणि या फांदीनेच दगा दिला. महावितरणच्या आजदे शाखेच्या पत्र्याच्या छतावर फांदी पडल्याने पत्रा तुटला आणि गळती लागली. त्यामुळे सोमवारी या गळक्या कार्यालयात बसूनच कर्मचाऱ्यांना काम करावे लागले. पण कार्यालयात पाणीच पाणी झाले आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तर टपटप पाणी गळत आहे. सोमवारी कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडताच त्यांना कार्यालयात पाणीच पाणी दिसले. पावसाचे गळणारे पाणी साठविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी टेबलावर बादली ठेवली होती. अशा वातावरणातच त्यांनी सोमवारी दिवसभर काम केले.
या शाखेचे नव्यानेच काम करण्यात आले आहे. मात्र तरीही छप्पर पावसात गळू लागल्याने कर्मचारीही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.याविषयी महावितरण विभागाशी संपर्क साधला असता, कार्यालयावरील झाडाची फांदी तुटल्याने ते छतावर पडून छताचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने कार्यालयात पावसाचे पाणी गळत आहे. याबाबत कल्याण झोनचे जनसंपर्क अधिकारी विजय दुधभाटे म्हणाले, पावसाची उघडीप मिळताच दुरुस्तीचे काम करण्यात येईल.