भुवनेश्वर (प्रतिनिधी: अवधुत सावंत) : येथील ‘बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियम’वर सुरू असलेल्या ४० व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार खो-खो स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राच्या मुलांनी व मुलींनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
मुलांच्या गटात महाराष्ट्राने आसामचा १५-१० असा एक डाव राखून ५ गुणांनी पराभव केला. सूरज जोहरे व आदित्य कुदळे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद करीत दोघांनी प्रत्येकी दोन मिनिटे संरक्षण केले. दुसऱ्या डावात किरण वसावे व भगतसिंग वसावे यांनी अनुक्रमे २.०० व २.१० मिनिटे संरक्षण केले. आसामच्या पप्पू गोगाई याने (१.३० मिनिटे संरक्षण) एकाकी लढत दिली.
मुलींच्या गटातील सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राने आसामवर २४-९ असा एक डाव राखून १५ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्राची दिपाली राठोड (२.२० मिनिटे संरक्षण व ६ गुण) व कौशल्या पवार (१.२० व १.४० मिनिटे संरक्षण आणि ५ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. तत्पूर्वी पहिल्या डावात अश्विनी शिंदे (२.०० मिनिटे संरक्षण), सरिता दिव्या व जानव्ही पेठे (प्रत्येकी २.१० मिनिटे संरक्षण) यांनी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली.
अन्य निकाल : मुले :मध्य भारत विजयी वि. पंजाब २५-११, केरळ विजयी वि. झारखंड १८-१४,ओरिसा विजयी वि. बिहार ३८-४, तामिळनाडू विजयी वि. पाँडिचेरी ११-५,हरियाणा विजयी वि. उत्तराखंड १४-११, आंध्रप्रदेश विजयी वि. दादर हवेली १६-६,कर्नाटक विजयी वि. मध्य प्रदेश २७-११, दिल्ली विजयी वि. हिमाचल प्रदेश १८-७,पश्चिम बंगाल विजयी वि. त्रिपुरा २३-४.
मुली :पंजाब विजयी वि. छत्तीसगड ९-६, पश्चिम बंगाल विजयी वि. मध्य प्रदेश २३-८,मणिपूर विजयी वि. आंध्रप्रदेश १२-९, राजस्थान विजयी वि. पाँडिचेरी १५-५,केरळ विजयी वि. बिहार १६-५, दिल्ली विजयी वि. दादर हवेली ३५-०.