ठाणे

अवजड वाहनांसाठी पार्किंगच्या जागा होणार निश्चित नवी मुंबई, खारेगाव, शहापूर, दापचारी येथे पार्किंग लॉट – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तातडीची बैठक

ठाणे,दि.२७ : ठाणे शहरातील मुख्य महामार्ग व घोडबंदर रस्त्यावर आज पुन्हा झालेल्या वाहतूक कोंडीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेतली. अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉटच्या जागा निश्चित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्री श्री. शिंदे बुधवारी नवी मुंबई, खारेगाव, शहापूर आणि दापचारी येथील मोकळ्या जागांची पाहणी करणार असून सुयोग्य जागा निश्चित करून त्या ठिकाणी पार्किंग लॉट उभारण्यात येणार आहेत. घोडबंदर रोडवर गायमुख येथे ऑइल टँकर उलटल्यामुळे आज वाहतूक कोंडी झाल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे, शहरात चालू असलेली विकासकामे यामुळे या वाहतूककोंडीत भर पडत आहे. मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरील वर्सोवा पूल आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम चालू असल्याने बरीचशी अवजड वाहने ठाणे मार्गे पुढे जात होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूककोंडी होऊन त्यात नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत होते. त्यातच सोमवारी मध्यरात्री टँकर उलटल्यामुळे पुन्हा एकदा घोडबंदर रोडवर वाहतूककोंडी झाली. त्यामुळे श्री. शिंदे यांनी तातडीने ठाणे पोलिस, वाहतूक पोलिस, ग्रामीण पोलिस, ठाणे महापालिका आदी संबंधित यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीस ठाणे ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विनय राठोड, मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत अवजड वाहने शहराच्या बाहेर पार्किंग लॉट तयार करून तिथे अडवून टप्प्याटप्प्याने पुढे सोडण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार, मंगळवारी या जागांची पाहणी पालकमंत्री श्री. शिंदे करणार आहेत. 

जेएनपीटीतून निघणारी वाहने जेएनपीटीच्या शेजारील पार्किंग लॉटमध्ये थांबवण्यात येणार आहेत, तसेच, मुंबई-नाशिक महामार्गावर खर्डी-सोनाळे-दापोडे येथे नाशिकवरून मुंबईकडे येणारी वाहने थांबवण्यासाठी, अहमदाबाद येथून मुंबईत येणारी वाहने दापचारी येथे थांबवण्यासाठी, ठाणे शहरात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी खारेगाव टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग लॉट तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी अवजड वाहने रोखून वाहतूक विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या  टप्याटप्याने ही वाहने शहरात सोडण्यात येतील, जेणेकरून वाहतुकीचे नियोजन करणे शक्य होईल. पालकमंत्री शिंदे हे स्वतः या नियोजित पार्किंग लॉटच्या जागांची पाहाणी करणार असून त्यानंतर या पार्किंगच्या जागा निश्चित करण्यात येतील. ठाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हे नियोजन असेल. त्यामुळे ठाणे शहरावर अवजड वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!