जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचे आवाहन
ठाणे (08 ऑक्टो, संतोष पडवळ ) : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने घेण्यात येणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा प्रथमच व्हर्च्युअल पध्दतीने 21 ते 24 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर गेले 2 वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होवू शकली नाही. परंतु या परंपरेत खंड पडू नये तसेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी यंदा व्हर्च्युअल ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करुन होणार असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेस उप महापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.
व्हर्च्युअल पध्दतीने होणाऱ्या या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये स्पर्धक जमावामधून न धावता स्वतंत्ररित्या धावणार आहेत, त्यामुळे गर्दी होणार नाही हा या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेसाठी मे. फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून ॲपची निर्मिती करण्यात आली असून सहभागी होणारे स्पर्धक AFS by Decathlon या ॲपवर ऑनलाईन नोंदणी करुन वैयक्तिेकरित्या धावणार आहेत. या ॲपवर स्पर्धा सुरू केल्याची व स्पर्धा संपल्याची नोंद होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.
ही स्पर्धा आठ गटात होणार आहे. स्पर्धेसाठी 21 वर्षावरील पुरूष व महिलांसाठी 21 कि.मी, 18 वर्षावरील पुरुष व महिलांसाठी 10 कि.मी, 15 वर्षावरील मुले व मुलींसाठी 5 कि.मी तर 12 वर्षावरील मुले व मुली यांच्याकरिता 3 कि.मी इतके अंतर ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांमधून लॉटरीद्वारे प्रत्येक गटातून तीन विजेते काढण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना ठाणे महापालिकेकडून मेडल्स व मे. डेकॅथलॉन स्पोर्टस इंडिया प्रा.लि. यांचेकडून भेटवस्तू व ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकास पदक व ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसाठी मे. डेकॅथलॉन स्पोर्टस इंडिया लि. हे स्पोर्टस पार्टनर म्हणून लाभले आहेत. ॲपवर ऑनलाईन नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास 9820536374 या क्रमांकावर संपर्क साधावा.
यंदा प्रथमच व्हर्च्युअल पध्दतीने होणाऱ्या या ‘’ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’’ स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.