डोंबिवली ( शंकर जाधव ) : स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सगळ्यात अधिक प्रमाणात आढळत असून दरवर्षी 1,50,000 पेक्षा जास्त स्त्रियांना याचे निदान होते. यासाठी स्त्रियांनी वर्षातून एकदा मॅमोग्रफी आणि महिन्यातून एकदा स्वपरीक्षण करणे अत्यावश्यक असते. यासाठी पुरुषांनी देखील महिलांना याबाबत जागृत करणे गरजेचे असून ज्या स्त्रिया या रोगाला सामोरे जात आहेत त्यांच्या पाठीशी पुरुषांनी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे मत कर्करोगतज्ञ डॉ. अनिल हेरुर यांनी व्यक्त केले. पुरुषांचा स्तनाच्या कर्करोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी तसेच स्त्री रुग्णाच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासाठी डोंबिवली येथे आप्पा दातार चौक येथे मेन फॉर पिंक या उपक्रमाचे शुक्रवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते. ऑक्टोबर महिना हा स्तनाचा कर्करोगाची जागृती करण्याचा महिना असल्याचे सांगताना पुरुषांमध्ये देखील स्तनाचा कर्करोग होत आल्याचे डॉ. हेरूर यांनी स्पष्ट केले. बंगळुरू येथे एका सहा वर्षीय मुलाला स्तनाचा कर्करोग झाल्याचे पुढे येत असल्याचे डॉ. हेरूर यांनी सांगितले. कर्करोग तज्ञ डॉ. तेजिंदर सिंग यांनी वयाच्या ८ वर्षापासून ते ९२ वर्षांपर्यंतच्या महिलेला कधीही स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कर्करोग झाल्यानंतर लगेच लक्षात आले तर हा कर्करोग पूर्ण बरा होतो असे सांगतानाच कर्करोगाची उपचार झाल्यानंतर पुढील दोन वर्षापर्यंत पुन्हा हा कर्करोग होण्याची शक्यता असते असे त्यांनी सांगितले. सर्व महिला वर्गाने महिन्यातून एकदा स्वपरीक्षण करणे गरजेचे असून वर्षातून एकदा मॅमोग्राफी करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. यावेळी एका पुतळ्याला ब्लाऊज आणि पॅन्ट असे दोन्ही पोशाख घालून प्रतिकृती तयार केली होती. यावेळी डॉ. जयश्री बँकिरा, जुवीएस लाइफ सायन्सचे संचालक निमिष ठक्कर माजी नगरसेविका खुशबू चौधरी, संदीप पुराणिक उपस्थित होते.
स्तनाच्या कर्करोगाची जागृती करणारा ऑक्टोबर महिना- मेन फॉर पिंक उपक्रमाचे आयोजन
October 9, 2021
38 Views
2 Min Read

-
Share This!