ठाणे, (संतोष पडवळ ) : अमेझॉनवरून आलेले पार्सल पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला गुंगारा देऊन इलेक्ट्रॉनिक वस्तू हडपणाऱ्या ठगाला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात भा. द. वि. कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फ्यूर्चर्ज ट्रॅव्हल आणि लॉजिस्टि्स कंपनीचा डिलिव्हरी बॉय अमेझॉनमधून आलेले एकूण ५२ हजार रुपयांचे पार्सल घेऊन जात होता. तो आनंदनगर डीलाईट सोसायटीजवळ दुचाकी पार्क करून पार्सल देण्यास गेला होता. हीच संधी साधून चोरट्याने दुचाकीवरील पार्सल बॅग चोरली. यामध्ये ५२ हजार रुपयांच्या एकूण ६२ वस्तू होत्या. यात इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू आणि कपडे होते.
चोरी झाल्याचे निदर्शनास येताच तत्काळ पोलीस तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता १३ ऑक्टोबर रोजी रश्मिन गडा या २० वर्षीय आरोपीला डोंबिवली येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५२ हजार रुपयांच्या वस्तूसह चोरीची ॲक्टिवाही हस्तगत करण्यात आली आहे.सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ श्री विनय राठोड , सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर खैरनार , पोलीस निरीक्षक जयराज रनवरे ,पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते ,पोलीस निरीक्षक धुमाळ ,पोलीस निरीक्षक रोकडे , पोलीस उपनिरीक्षक सचिन सरडे , पोलीस हवालदार खरात , पाटील, चौधरी , महापुरे पोलीस नाईक घुगे , गायकवाड यांनी पार पाडली. तर या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक श्री घुगे करत आहेत