ठाणे

जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम

नव मतदारांना नाव नोंदणीसाठी साप्ताहिक सुट्टयांच्या दिवशी विशेष मोहिम

युवा-युवतींनी मोहिमेत सक्रीय सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

ठाणे दि.9 :  जिल्ह्यामध्ये दि.1 नोव्हेंबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम ‍राबविण्यात येत असून जे युवा युवती दि. 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यांना या विशेष मोहिमेत मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी दि. 13, 14, 27 आणि 28 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. जिल्ह्यातील युवा-युवतींना या मोहिमेत सक्रीय सहभाग घेवून नाव नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात 2022 मध्ये  महापालिकांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नव मतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी ही मोहिम उपयुक्त ठरणार असून दि. 30 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी केलेल्यांचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल. जेणे करुन त्यांना येत्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यासाठी जे युवा-युवती 1 जानेवारी 2022 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण करतील. त्यांनी जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात भेट द्यावी. अथवा NVSP पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन, जिल्हाधिकारी श्री.नार्वेकर यांनी केले आहे. 

मतदार यादीमधून मृत नातेवाईंकाचे नाव वगळण्यासाठी, एकच नाव दोन ठिकाणी नोंदविले असल्यास त्यातील एक नाव वगळण्यासाठी अर्ज क्र.7 भरुन द्यावा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द झालेल्या आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रकाशित झालेल्या प्रारुप यादीमध्ये मतदारांनी आपले नाव, जन्म तारीख, वय, छायाचित्र ओळखपत्र क्रमांक, लिंग, पत्ता, मतदार संघ, नातेवाईकाचे नाव, त्यांच्याशी असलेले नाते आदि बाबी मतदार यादीत अचूक आहेत याची पडताळणी करावी. त्याबाबत काही बदल करावयाचे असल्यास त्यासाठी नमुना नं.8 भरुन मतदार नोंदणी कार्यालयात अथवा ऑनलाईन  सादर करावा, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळविले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!