ठाणे दि.10 :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संघ लोकसेवा आयोग,एनडीअे आणि एनअे परिक्षा व सीडीएस परिक्षा 2021 रविवार दि.14 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहेत. एकूण 12 उपकेंद्रावर दोन/तीन सत्रात होणार असून या परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.
ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंह यांच्या या आदेशानुसार, दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 07 वाजेपासून ते सायं. 06.00 वाजेपर्यंत हे मनाई आदेश लागू आहेत. या काळात परीक्षा सुरू असताना पोलीस विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच परिक्षा केंद्रावरील संबधित प्राधिकृत अधिकारी,कर्मचारी, परिक्षेस बसलेले उमेदवार यांच्या खेरीज अन्य व्यक्तींना केंद्रावर/उपकेंद्राच्या 100 मीटर परीसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ ही दुकाने, सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.