ठाणे

जिल्हा सामान्य रुग्णालयातील मॉडेल ॲण्टी रेबीज क्लिनिकच्या स्थापनेस गती द्यावी-सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी

जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समितीची सभा संपन्न

ठाणे दि.१७ : श्वानदंशामुळे होणाऱ्या रेबीज आजाराचे निर्मूलन २०३० पर्यंत करण्याचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मॉडेल ॲण्टी रेबीज क्लिनिकच्या स्थापनेस गती द्यावी, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी आज येथे केली.

जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समितीची सभा श्री. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी, पाळीव प्राण्यांची नोंदणी करुन त्यांचे नियमीत लसीकरण करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हवामान बदलाचा मानवी जीवनावर आणि आरोग्यावर विविध प्रकारे परिणाम होत आहे.जागतीक हवामान बदलाच्या आरोगयाशी  संबधित समस्यांशी लढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पर्यावरण रक्षण ही प्रत्येकांची जबाबदारी आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे ही श्री.ठोंबरे यांनी सांगितले.

रेबीज निर्मुलनाच्या मोहिमेसाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात मॉडेल ॲण्टी रेबीज क्लिनिक स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे रेबीज रुग्णांचे उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना श्वान दंश झालेल्या रुग्णांचे समुपदेश याबाबी करण्यात येतील. जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान ७८०१ श्वान दंशाची प्रकरणे नोंदविली गेल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, यावेळी हवामान बदल  आणि मानवी आरोग्य यासाठी असलेल्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक देखील झाली. हवामानातील होणाऱ्या बदलामुळे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम व योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोषी जाधव, उप प्रादेशिक अधिकारी एस. वाय. कोपरकर, कळवा वैद्यकीय कॉलेज अधिष्ठाता  एस. जी. कामखेडकर, क्षेत्र अधिकारी डॉ.महेंद्र पट्टेबहादूर,औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासन कैलास खापेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अनिता जवंजाळ,जिल्हा साथरोग तज्ञ डॉ.प्रेरणा आवटे आदी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!